फोटो सौजन्य - Social Media
घटस्फोट म्हणजे एखाद्या नात्याला संपवणार धार धार अस्त्र! या अस्त्राचा वार झाला तर नात्याचे दोन तुकडे होतात. असे तुकडे की दोन जीव शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या वेगळे होऊन जातात. घटस्फोटाला भारतात नात्याचा प्रखर शत्रू समजला जातो, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की घटस्फोटाचेही प्रकार असतात. अशामध्ये एक प्रकार म्हणजे ‘Sleep Divorce’.
नावाने जरी वेगळा वाटत असला तरी ‘Sleep Divorce’ हा पारंपरिक घटस्फोटापेक्षा खूप वेगळा आणि वास्तवात नातं अधिक मजबूत करणारा प्रकार आहे. अनेकांना ‘Divorce’ हा शब्द ऐकून नकारात्मक वाटू शकते, पण Sleep Divorce नात्यातील तणाव किंवा दुरावा वाढवण्याऐवजी तो कमी करण्याच्या उद्देशाने केला जातो. अनेकदा नात्यामध्ये जितकी जवळीक आणि एकत्र वेळ घालवणं गरजेचं असतं, तितकंच एकमेकांना ‘Space’ देणंही तेवढंच आवश्यक असतं. सततचं एकत्र असणं कधी कधी वैयक्तिक शांतता आणि मनःशांती हिरावून घेऊ शकतं. त्यातून निर्माण होणारे कुरबुरी, चिडचिड, निद्रानाश आणि मानसिक थकवा नात्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
Sleep Divorce म्हणजे एकाच घरात राहूनही झोपेसाठी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये किंवा बेडवर झोपणं. यामध्ये दिवसाचा उरलेला वेळ एकत्र घालवला जातो, संवाद केला जातो, प्रेम आणि सहवासाचा अनुभव घेतला जातो, मात्र झोपेच्या वेळेस एकमेकांना आवश्यक ती वैयक्तिक जागा आणि शांतता दिली जाते. त्यामुळे दोघांनाही झोप पूर्ण होण्यास, शरीर-मन ताजं ठेवण्यास आणि दुसऱ्या दिवशीच्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडण्यास मदत होते.
या प्रकारातून दोघांनाही स्वतःच्या भावना आणि समोरच्याच्या भावना समजून घेण्यास वेळ मिळतो. झोपेच्या वेळेत मिळणारा हा वैयक्तिक वेळ नात्यातील भावनिक गुंतवणुकीला टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. अन्यथा, झोपेत येणारे व्यत्यय, सवयीतील फरक किंवा लहानसहान वाद नात्याच्या गाठी सैल करू शकतात. Sleep Divorce हे त्या टोकाच्या स्थितीपर्यंत पोहोचण्याआधीच एक उपचारात्मक पर्याय म्हणून पाहिलं जातं, जे नात्याला टिकवून ठेवण्यात आणि प्रेमाला अधिक खोल बनवण्यात मदत करतं.
भारत देशात अशा प्रकारचा घटस्फोट सहसा पाहायला मिळत नाही. पण पाश्चिमात्य देशांमध्ये याचा फार प्रभाव आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये 35% जोडपे Sleep Divorce चे पालन करत आहेत. या Divorce मध्ये होणार नुकसान म्हणजे नात्यात शारीरिक संबंध असणे आवश्यक आहे, याने दोन्ही जीव शारीरिक आणि भावनिकरीत्या जोडले जातात. परंतु, Sleep Divorce मध्ये बेडटाईम इन्टिमेन्सी जवळजवळ बंद होते. कधी कधी यामुळे नात्यात दुरावा वाढण्याची शक्यता असते. जोडप्यांना एकटेपणा जाणवू लागतो.