
रक्तदान करायला भीती वाटते? जाणून घ्या सामान्य गैरसमज आणि त्यामागील वास्तव
देशात प्रत्येक दोन सेकंदाला एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते. हा आकडा केवळ एक सांख्यिकीय माहिती नसून अनेक रुग्णांच्या जीवनाशी निगडित वास्तव आहे. ही व्यक्ती थॅलेसेमियाने ग्रस्त असलेले एखादे आजारी मूल असू शकते, प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण झालेली आई असू शकते, केमोथेरपी घेत असलेला कर्करोग रुग्ण असू शकतो किंवा रस्ते अपघातात जखमी झालेली आणि तातडीने रक्ताची गरज असलेली व्यक्ती असू शकते. यातील अनेक भीती आणि शंका या वर्षानुवर्षे प्रचलित असलेल्या गैरसमजांवर आधारित आहेत. वैद्यकीय विज्ञान आणि रक्तपेढी व्यवस्थापनात मोठी प्रगती झाली असली तरी रक्तदानाबाबतच्या जुन्या आणि चुकीच्या समजुती आजही अनेक निरोगी लोकांना रक्तदानापासून परावृत्त करतात. याबद्दल डॉ. स्नेहल मुजुमदार, रक्तपेढीचे संचालक, रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांनी दिलेली सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – AI)
रक्त हे शरीराचे “जीवनदायी द्रव्य” आहे. याला अनेकदा शरीराचा “द्रवरूप अवयव” असेही म्हटले जाते. हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही आणि ते फक्त दुसऱ्या व्यक्तीकडून मिळू शकते. गर्भातील बाळाला काही वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान रक्ताची गरज भासू शकते, तर दुसरीकडे जटिल शस्त्रक्रिया करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही रक्ताची आवश्यकता असू शकते. रक्तदानासाठी वय, जात, धर्म किंवा पंथ यांना कोणतेही महत्त्व नसते. नवजात बाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांचे प्राण वाचवणारे हे जीवनासाठी दिलेले अनमोल दान आहे.
रक्तदान करू इच्छिणाऱ्या अनेक व्यक्तींना रक्तदान प्रक्रियेदरम्यान एखादा संसर्गजन्य आजार होण्याची भीती वाटते. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या हे अशक्य आहे. रक्तदानाच्या प्रक्रियेत निर्जंतुक आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा वापर केला जातो. प्रत्येक रक्तदात्यासाठी नवीन रक्तपिशवी आणि पूर्णपणे निर्जंतुक केलेली नवीन सुई वापरली जाते. त्यामुळे रक्तदानामुळे कोणताही संसर्ग होण्याचा धोका जवळपास नगण्य असतो.
रक्तदानाबाबत आणखी एक अतिशय सामान्य गैरसमज म्हणजे रक्तदान केल्यानंतर शरीर दीर्घकाळ कमकुवत होते. अनेकांना असे वाटते की रक्तदानादरम्यान गमावलेले रक्त लवकर भरून निघत नाही आणि त्यामुळे शरीर अनेक वर्षे अशक्त राहते. प्रत्यक्षात रक्तदानावेळी केवळ ३५० मिली किंवा ४५० मिली रक्त घेतले जाते (रक्तदात्याच्या वजनानुसार), तर मानवी शरीरात साधारणपणे पाच लिटर रक्त असते. त्यामुळे गमावलेल्या रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी असते. शरीरातील द्रवपदार्थांची भरपाई साधारण एका दिवसात होते, तर लाल रक्तपेशींची पुनर्निर्मिती काही महिन्यांत पूर्ण होते. रक्तदानानंतर योग्य वेळी पौष्टिक आहार घेणे आणि शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखणे महत्त्वाचे असते. रक्तदानापूर्वी प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याविषयी संपूर्ण आणि प्रामाणिक माहिती देणे आवश्यक असते.
वेदनेची भीती हे देखील अनेकांना रक्तदानापासून दूर ठेवणारे एक महत्त्वाचे कारण आहे. मोठ्या सुई, वेदनादायक प्रक्रिया आणि रक्तदानादरम्यान होणाऱ्या त्रासाबाबतच्या अनेक कथा लोकांमध्ये प्रचलित आहेत. त्यामुळे अनेकजण रक्तदान शिबिरात सहभागी होण्यास टाळाटाळ करतात. मात्र प्रत्यक्षात रक्तदान करताना फक्त इंजेक्शन घेताना किंवा मुंगी चावल्यावर जाणवतो तसा हलकासा चिमटा बसतो. संपूर्ण रक्तदान प्रक्रिया साधारणपणे पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होते आणि बहुतेक लोकांसाठी ती वेदनारहित असते.
औषधोपचार सुरू असलेल्या व्यक्तींमध्येही रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आढळून येतात. अनेकांना वाटते की एकदा औषधे सुरू झाली की ते रक्तदान करू शकत नाहीत. मात्र प्रत्यक्षात हे संबंधित आजार आणि घेतल्या जाणाऱ्या औषधांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, नियंत्रित रक्तदाबासाठी औषधे घेणाऱ्या अनेक व्यक्ती आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षितपणे रक्तदान करू शकतात. त्यामुळे आपण कोणती औषधे घेत आहोत आणि आपली वैद्यकीय स्थिती काय आहे, याची संपूर्ण माहिती वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
याचप्रमाणे रक्तगटांबाबतही अनेक गैरसमज आहेत. O पॉझिटिव्ह किंवा B पॉझिटिव्ह यांसारखे सामान्य रक्तगट असलेल्या अनेक रक्तदात्यांना असे वाटते की रक्तपेढ्यांमध्ये या रक्तगटांचा पुरेसा साठा असतो आणि त्यामुळे त्यांच्या रक्तदानाची विशेष गरज नसते. मात्र वस्तुस्थिती याउलट आहे. हे रक्तगट सर्वाधिक प्रमाणात आढळतात आणि बहुसंख्य रुग्णांना याच रक्तगटांची आवश्यकता भासत असते. त्यामुळे या रक्तगटांच्या रक्ताची मागणीही सतत मोठ्या प्रमाणात असते.
Rh-निगेटिव्ह रक्तगट असलेल्या काही व्यक्तींना असे वाटते की त्यांच्या रक्ताची गरज फक्त जीवघेण्या आपत्कालीन परिस्थितीतच भासते, त्यामुळे त्यांनी रक्तदान करण्याची घाई करू नये. मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. रक्तदान ही अशी प्रक्रिया नाही की रक्ताची गरज निर्माण झाल्यावर किंवा रक्तपेढीकडून फोन आल्यानंतरच केली जाते. रक्तदान केलेले रक्त रुग्णांसाठी वापरण्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमधून जावे लागते. यामध्ये रक्तगट निश्चित करणे, रक्तघटक वेगळे करणे, HIV, हिपॅटायटिस C यांसारख्या संसर्गजन्य आजारांच्या चाचण्या करणे आणि इतर आवश्यक तपासण्या यांचा समावेश असतो. या सर्व प्रक्रियांना काही तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे रक्तपेढ्यांना सर्व रक्तगटांचा, विशेषतः दुर्मिळ रक्तगटांचा, पुरेसा साठा नेहमीच उपलब्ध ठेवावा लागतो.
रक्तदानाबाबतचे अनेक गैरसमज ग्रामीण आणि निमशहरी भागात आजही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पुरुषांबाबत एक सामान्य समज असा आहे की रक्तदान केल्यानंतर त्यांची ताकद कमी होते, उत्साह घटतो किंवा पुरुषत्वावर परिणाम होतो. मात्र या समजुतींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. रक्ताचे मुख्य कार्य म्हणजे शरीरातील विविध अवयवांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचवणे. पुरुषत्व, प्रजननक्षमता किंवा लैंगिक क्षमता यांचा रक्ताच्या प्रमाणाशी कोणताही संबंध नसतो.
आणखी एक खोलवर रुजलेला गैरसमज म्हणजे शाकाहारी लोकांकडे रक्तदान करण्याइतके पुरेसे रक्त नसते. आहारतज्ज्ञांच्या मते, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली धान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असलेला संतुलित शाकाहारी आहार शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतो आणि निरोगी रक्तनिर्मितीस मदत करतो. रक्तदानापूर्वी हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते आणि रक्तदाता रक्तदानासाठी पात्र आहे की नाही हे त्यावरून निश्चित केले जाते. त्यामुळे शाकाहारी आहार हा रक्तदान न करण्याचा आधार असू शकत नाही.
महिलांच्या रक्तदानाबाबतही अनेक गैरसमज प्रचलित आहेत. काही लोकांना वाटते की शारीरिकदृष्ट्या महिला रक्तदानासाठी योग्य नसतात. प्रत्यक्षात निरोगी महिला सुरक्षितपणे रक्तदान करू शकतात. प्रसूतीनंतरचा काही कालावधी, स्तनपानाचा काळ किंवा मासिक पाळीदरम्यान काही विशिष्ट परिस्थितींमध्ये त्यांना तात्पुरते रक्तदान करण्यास मनाई असू शकते; मात्र इतर वेळी महिला पूर्णपणे सुरक्षितपणे रक्तदान करू शकतात.
रक्तदानाशी संबंधित सर्वात विचित्र गैरसमजांपैकी एक म्हणजे रक्ताला धर्म, जात किंवा आहाराची ओळख असते. काही लोकांना असे वाटते की रक्तदाता शाकाहारी आहे की मांसाहारी, हिंदू आहे की मुस्लिम, ख्रिश्चन, ब्राह्मण किंवा दलित आहे याचा रक्तावर परिणाम होतो. प्रत्यक्षात रक्ताला कोणताही धर्म, जात किंवा आहाराशी संबंधित भेद नसतो. रक्तदानानंतर केवळ रक्तगटाची सुसंगती महत्त्वाची असते आणि ती वैज्ञानिक निकषांनुसार तपासली जाते.
रक्तदानाचे काही फायदे रक्तदात्यांनाही मिळतात. नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक वेळी हिमोग्लोबिनसारख्या मूलभूत आरोग्य तपासण्या मोफत करून घेण्याची संधी मिळते. रक्तदानानंतर शरीर पुन्हा नवीन रक्त तयार करण्याचे काम सुरू ठेवते. मात्र बहुतेक रक्तदात्यांसाठी सर्वात मोठे समाधान म्हणजे त्यांनी एखाद्याचे प्राण वाचविण्यास हातभार लावला आहे ही भावना.
अशा अंधश्रद्धा आणि गैरसमजांमुळे रक्तपेढ्यांवरील ताण वाढतो. मोठ्या प्रमाणावर लोक रक्तदान करत नसतील तर रक्तसाठा कमी होतो आणि उपचार करणे कठीण बनते. रक्तटंचाईच्या काळात काही रुग्णांचे रक्तसंक्रमण पुढे ढकलावे लागू शकते आणि आपत्कालीन परिस्थितीत गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात.वैद्यकीय विज्ञान सतत प्रगत होत असले तरी स्वेच्छेने केलेल्या रक्तदानाचे महत्त्व आजही तितकेच कायम आहे. त्यामुळे रक्तदानाबाबतचे गैरसमज दूर करणे आणि समाजात अधिक जनजागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
सत्य अतिशय सोपे आहे. रक्तदान सुरक्षित आहे, सोपे आहे आणि अनेकांचे प्राण वाचवणारे आहे. योग्य माहिती आणि जनजागृतीमुळे लोकांच्या मनातील भीती कमी होऊ शकते, अधिकाधिक लोक रक्तदानासाठी पुढे येऊ शकतात आणि अगदी कमी प्रयत्नांत अनेक मौल्यवान जीव वाचू शकतात. कारण देशात कुठेतरी, कोणीतरी आजही रक्ताची वाट पाहत आहे.
Ans: अनेकांना सुईची भीती, रक्त कमी होईल अशी चिंता किंवा रक्तदानानंतर कमजोरी येईल असा गैरसमज असल्यामुळे भीती वाटू शकते.
Ans: नाही. निरोगी व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर शरीर काही काळात नवीन रक्तपेशी तयार करते.
Ans: रक्तदानाची प्रक्रिया साधारणपणे सोपी असते. सुई टोचताना थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते, पण प्रक्रिया वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केली जाते.