फोटो सौजन्य - Social Media
बहुतेक लोकांना वाटतं की प्रेमाच्या नात्यात सतत भांडणं होणं म्हणजे नातं बिघडत चाललंय. पण खरं पाहिलं तर, प्रत्येक नात्यात काही ना काही मतभेद, गैरसमज किंवा तणाव निर्माण होतोच. त्यामुळे भांडणं होणं ही फारस धक्कादायक गोष्ट नाही. विशेष म्हणजे काही वेळा नात्यातील भांडणं ही नातं अधिक मजबूत करण्याचं काम करतात. अर्थातच, त्या भांडणांचा स्वरूप कसं आहे, हे महत्त्वाचं असतं.
जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात, आपली मतं व्यक्त करतात, तेव्हा त्या दोघांमध्ये एक प्रकारचं प्रामाणिक नातं निर्माण होतं. आपल्या भावना रोखून ठेवणं, न बोलता गप्प बसणं, किंवा टाळाटाळ करणं हे दीर्घकालीन नात्याला अधिक नुकसानदायक ठरू शकतं. कारण अशावेळी व्यक्त न झालेल्या भावना मनात साचत जातात आणि त्याचा स्फोट एखाद्या क्षुल्लक गोष्टीवर होतो.
भांडणं जर एकमेकांचा अपमान करण्यासाठी, दुखावण्यासाठी किंवा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी होत असतील, तर ती नक्कीच घातक असतात. अशावेळी नात्यात ताण निर्माण होतो, विश्वास कमी होतो आणि एकमेकांपासून अंतर वाढतं. मात्र जर भांडणं एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी, मतभेद सोडवण्यासाठी किंवा समोरच्याचं म्हणणं समजून घेण्यासाठी होत असतील, तर ती नातं अधिक प्रगल्भ बनवतात.
“Healthy Fights” म्हणजे काय? जिथे दोघंही शांतपणे आपली भूमिका मांडतात, ऐकून घेतात, रागात न बोलता संयम ठेवतात, आणि शेवटी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, ती भांडणं नात्याला अधिक समजूतदार बनवतात. अशा वेळेस एकमेकांच्या भावना, गरजा आणि अपेक्षा स्पष्ट होतात.
भांडणानंतर माफ करणं, संवाद पुन्हा सुरू करणं, आणि एकत्रच पुढे जाण्याचा निर्धार करणं हेच नात्याचं खरे सौंदर्य असतं. प्रत्येक भांडण एक संधी असते, एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची. शेवटी एवढंच म्हणता येईल की, भांडणं ही नात्याची शेवट नसून, संवादाची, समजुतीची आणि वाढीची सुरुवात असू शकते… जर दोघंही एकमेकांप्रती प्रामाणिक आणि जबाबदार असतील, तर.