फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता अक्षय कुमार यांनी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली मुलाखत चर्चेत होती. आता त्यांनी पंतप्रधान मोदींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये मोदींनी फिटनेस आणि आरोग्याबाबत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या पोस्टसोबत अक्षय कुमार यांनी काही टिप्सही दिल्या आहेत ज्याद्वारे स्वतःला कसे फिट ठेवता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
लठ्ठपणाची समस्या आणि उपाय
या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “आपण सर्वजण फिटनेसचे महत्त्व समजतो, पण मी आज एक मोठ्या समस्येबाबत बोलू इच्छितो. आपल्याकडे लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याचा त्रास तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच होत आहे. ही चिंतेची बाब आहे कारण लठ्ठपणामुळे डायबेटीस, हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते.”
फिटनेस मंत्र
पंतप्रधान मोदींनी या समस्येवर उपाय सांगताना लोकांना दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे – व्यायाम आणि संतुलित आहार. त्यांनी सांगितले, “दररोज थोडा वेळ काढून चालणे, वर्कआउट करणे किंवा कोणतीही शारीरिक क्रिया करा.”
तेलाचा वापर कमी करा
आहाराबाबत बोलताना मोदी म्हणाले, “आपल्या जेवणात अनहेल्दी फॅट कमी करा. जसे घरात दरमहा दोन लिटर तेल वापरत असाल, तर त्यात 10 टक्के कपात करा. आपल्या जीवनशैलीत असे छोटे बदल मोठे परिणाम घडवू शकतात.” त्यांनी ताजी आणि नैसर्गिक अन्न खाण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
अक्षय कुमार यांनीही पंतप्रधान मोदींच्या फिटनेस टिप्सना पूरक सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आरोग्य हेच सर्वकाही आहे आणि निरोगी जीवनशैलीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.” त्यांनी लठ्ठपणावर मात करण्यासाठी पुरेशी झोप घेणे, सकाळची ताजी हवा मिळवणे, शरीराला आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश घेणे यावर भर दिला आहे. याशिवाय अन्नात कमी तेलाचा वापर करणे आणि शक्यतो देशी घी वापरून बनवलेले पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अक्षय कुमार म्हणतात की, कोणताही व्यायाम करा, मग तो चालणे असो, जॉगिंग असो किंवा जिममधील वर्कआउट असो, पण तो नियमित करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, नियमित व्यायामाच्या सवयीमुळे केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही तर मानसिक स्थैर्यही मिळते. त्यामुळे तुमचे जीवन सकारात्मक दिशेने बदलू शकते. तर आता या फिटनेस मंत्राचा अवलंब करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि एक आनंदी, निरोगी जीवनशैली स्वीकारा!