
Crispy Thin Poha Chivda Recipe: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
दिवाळी आली की घरात फराळाची धांदल सुरू होते. चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी आणि सगळ्यात आवडता म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा. संध्याकाळी चहासोबत गरम गरम चिवडा खायला कोणाला आवडत नाही? पण घरी बनवताना बऱ्याच जणांचा चिवडा फसतो. कधी पोहे आकसतात, कधी चिवडा वातड होतो, तर कधी त्याला रंगच येत नाही. दुकानात मिळतो तसा कुरकुरीतपणा घरी येतच नाही.
जर तुमच्यासोबत पण असं होत असेल, तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. Trupti Kitchen Katta या चॅनलवर सांगितलेली ही पद्धत थोडी वेगळी आहे. यात पोहे भाजण्याआधी त्यांना थोडंसं तेल लावलं जातं, त्यामुळे पोहे अजिबात आकसत नाहीत आणि एकदम खुसखुशीत होतात. चला तर मग बघूया अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा. Crispy Thin Poha Chivda Recipe:
अर्धा किलो पातळ पोहे, तळण्यासाठी तेल, एक वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे पातळ काप, एक छोटी वाटी काजू बदामाचे काप, थोडी मनुका, एक मोठी वाटी डाळवं, भरपूर कढीपत्ता, तिखटासाठी हिरव्या किंवा लाल मिरच्या.
फोडणीसाठी – एक चमचा मोहरी, छोटा चमचा हिंग, हळद, अर्धा छोटा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा लिंबू सत्व किंवा आमचूर पावडर, एक छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ, पाव चमचा गरम मसाला आणि चाट मसाला.
पातळ पोह्यांमध्ये खूप बारीक कचरा असतो, भुसा असतो, तुकडे असतात. त्यामुळे आधी पोहे चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या. हे काम तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता. चाळल्यामुळे चिवडा छान दिसतो आणि खाताना दातात कचकच येत नाही.
हीच खरी या रेसिपीची ट्रिक आहे. एका मोठ्या परातीत थोडे थोडे पोहे घ्या. एका वाटीत थोडं तेल घ्या. बोटं तेलात बुडवून हाताला तेल लावा आणि मग त्या हाताने पोह्यांना हलकं तेल चोळा. सगळ्या पोह्यांवर एकदम तेल ओतू नका. दोन दोन मूठ पोहे घेऊन तेल लावा. जास्त तेल लावू नका, नाहीतर पोहे तेलकट होतील. फक्त हाताला ओलसरपणा येईल एवढंच तेल पुरे.
तेल लावलेले पोहे मोठ्या कढईत टाका. गॅस मध्यम ते बारीक ठेवा. एकदम सगळे पोहे टाकू नका, दोन वेळा करून भाजा. कढई भरून टाकली तर पोहे सारखे भाजले जाणार नाहीत. एका हाताने पळीने आणि दुसऱ्या हाताने अलगद पोहे वर खाली करत राहा. पोहे गरम झाले, हलवले की खुळखुळ आवाज आला की समजायचं भाजले. करपवू नका. भाजल्यावर मोठ्या ताटात काढून पूर्ण थंड होऊ द्या. गरम असताना ते मऊ लागतात, थंड झाल्यावरच त्यांचा कुरकुरीतपणा कळतो.
आता कढईत तेल गरम करा. आधी खोबऱ्याचे काप सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर शेंगदाणे कुरकुरीत तळा. मग काजू बदाम तळा. मनुके टाकत असाल तर शेवटी टाका, कारण ते लगेच फुगतात. प्रत्येक वस्तू वेगळी तळा, एकत्र टाकू नका. म्हणजे सगळं व्यवस्थित कुरकुरीत राहतं. तळलेलं सगळं साहित्य चाळणीत काढा म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल.
यानंतर डाळवं हलकं तळून घ्या, त्याला जास्त वेळ नको. कढीपत्ता आणि मिरच्या पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
कढईत थोडं तेल ठेवून बाकीचं काढून टाका. तेलात मोहरी टाका, तडतडली की गॅस बंद करा. आता हिंग आणि हळद टाका. गॅस बंद करूनच हळद टाकायची, नाहीतर हळद करपते आणि कडू लागते. फोडणी थोडी कोमट होऊ द्या.
आता एक खास मसाला बनवूया. मिक्सरमध्ये धणे, जिरे, बडीशेप, लिंबू सत्व, साखर, मीठ, गरम मसाला आणि चाट मसाला टाकून बारीक पूड करा. यामुळे चिवड्याला आंबट गोड चटपटीत चव येते.
मोठ्या परातीत थंड झालेले पोहे घ्या. त्यात तळलेले सगळं साहित्य टाका. आता बनवलेला मसाला दोन वेळा करून टाका, एकदम ओतू नका. कोमट फोडणी पण थोडी थोडी टाकून हलक्या हाताने मिसळा. जोरात कालवू नका, नाहीतर पोहे तुटतील.
झाला आपला बाजारासारखा कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तयार. पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरा, म्हणजे महिनाभर तसाच कुरकुरीत राहील.
Ans: पोहे भाजण्याआधी हाताला थोडे तेल लावून पोह्यांना हलकेच तेल चोळावे आणि मंद ते मध्यम आचेवर भाजावे.
Ans: पोहे भाजण्यापूर्वी त्यांना थोडे तेल लावावे. मात्र, जास्त तेल लावू नये.
Ans: पोहे मध्यम ते बारीक आचेवर थोडे थोडे करून भाजावेत आणि करपणार नाहीत याची काळजी घ्यावी.