
मित्रमंडळींच्या मैफिलीत दारूचा विषय निघालो की, सोबतीला ‘चकना’ हा शब्द अगदी ठरलेला असतो. शेव, चिवडा, शेंगदाणे, वेफर्स किंवा अगदी चिकन-मटण असो, दारू पिताना सोबत खाल्ल्या जाणाऱ्या स्नॅक्सना आपल्याकडे सर्रास ‘चकना’ म्हटले जाते. पण या पदार्थांना हे नाव कसे पडले आणि ही पद्धत कधीपासून सुरू झाली, याचा इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे.
‘चकना‘ या नावाचा उगम कसा झाला?
‘चकना’ हा शब्द मूळचा ‘चखना’ – चाखणे या हिंदी क्रियापदावरून आला आहे. याचा थेट संबंध चवीशी आहे. दारूची चव सहसा कडू आणि उग्र असते. ती पिल्यानंतर जिभेची चव बदलते. ही उग्रता कमी करण्यासाठी आणि तोंडाची चव बदलण्यासाठी जे पदार्थ ‘चाखले’ जातात, त्यांना काळांतर्गत ‘चकना’ म्हटले जाऊ लागले.
मेक्सिकन संस्कृतीतही ‘चकाना’ नावाचा एक शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘काहीतरी चघळणे’ असा होतो. मात्र, भारतातील ‘चकना’ हा शब्द पूर्णपणे ‘स्वाद चाखणे’ या संकल्पनेतूनच तयार झाला आहे.
‘दारू विथ चकना‘ पद्धत कधीपासून सुरू झाली?
प्राचीन काळ: भारतात प्राचीन काळातील राजे-महाराजे जेव्हा ‘मदिरा’ प्राशन करायचे, तेव्हा त्यांच्या सोबतीला सुका मेवा, भाजलेले मांस आणि फळे ठेवली जात असत. याला ‘उपदंश’ म्हटले जायचे.
मुघल काळ: मुघल साम्राज्यात सुरा आणि साकीच्या मैफिली प्रसिद्ध होत्या. या काळात दारूची उग्रता कमी करण्यासाठी ‘कबाब’ आणि ‘तळलेले पदार्थ’ खाण्याची पद्धत खूप लोकप्रिय झाली.
आधुनिक काळ: पुढे इंग्रजांच्या काळात ‘बार संस्कृती’ आली. इंग्रज दारूसोबत ‘फिंगर फूड्स’ खायचे. याच इंग्रजी पद्धतीचे भारतीयीकरण झाले आणि सर्वसामान्य माणसाच्या भाषेत त्याचे नाव ‘चकना’ झाले.
Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय
वैज्ञानिक कारण काय?
दारू सोबतीला चकना खाण्यामागे केवळ चव बदलणे हेच कारण नाही, तर त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. रिकाम्या पोटी दारू पिल्यास ती थेट आणि वेगाने रक्तात मिसळते, ज्यामुळे लवकर नशा चढते आणि ॲसिडिटी होऊ शकते. चकना खाल्ल्यामुळे पोटात अन्नाचा थर तयार होतो, ज्यामुळे अल्कोहोल शरीरात शोषून घेण्याचा वेग मंदावतो. थोडक्यात सांगायचे तर, जिभेची चव बदलण्यापासून सुरू झालेली ही ‘चाखण्याची’ पद्धत आज प्रत्येक पार्टीचा एक अविभाज्य आणि लोकप्रिय भाग बनली आहे.