Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याचा जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या नियमित तपासणीचे महत्त्व
Early Breast Cancer: कल्पना करा की, एका महिलेने अर्ली ब्रेस्ट कॅन्सरवरील (प्रारंभिक स्तनाचा कर्करोग) उपचार पूर्ण केले आहेत. तिची शस्त्रक्रिया पार पडली आहे, तिने डॉक्टरांनी सुचवलेले उपचार पूर्ण केले आहेत आणि फॉलो-अप तपासण्यांमधून दिलासादायक बातम्या येत आहेत. हळूहळू ती तिच्या नियमित दिनचर्येकडे परत येऊ लागते, नवीन योजना आखते आणि भविष्याकडे पाहू लागते. पण, एक प्रश्न कायम राहतो: उपचार पूर्ण होणे म्हणजे कॅन्सर कधीही परत येऊ शकत नाही का? अनेक महिलांसाठी अर्ली ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर संभाषणाचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. उपचार पूर्ण होणे हा महत्त्वाचा टप्पा असला, तरी कर्करोग पुन्हा उद्भवण्याचा धोका कधी-कधी अनेक वर्षांपर्यंत कायम राहू शकतो.(फोटो सौजन्य – istock)
Skin Infection: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसल्यास व्हा सावध! जाणून घ्या संसर्गाची गंभीर लक्षणे
ज्यूपिटर हॉस्पिटल, ठाणे येथील सीनियर कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. चेतना बक्षी म्हणाल्या, “अर्ली ब्रेस्ट कॅन्सरच्या व्यवस्थापनामध्ये केवळ आजारावर उपचार करण्यापेक्षा बरेच काही समाविष्ट असते, यामध्ये काळानुरूप हा आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी करण्यावरही लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असल्याने कॅन्सरचा उपप्रकार, व्यक्तीनुसार पुन्हा उद्भवण्याचा धोका आणि विविध थेरपींचे अपेक्षित फायदे यांच्या आधारावर उपचारांची निवड केली पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमधील सतत प्रगतीमुळे काळजी घेण्याच्या अधिक वैयक्तिकृत पद्धतींचा अवलंब करणे शक्य होत आहे. तसेच, उपचारांशी संबंधित दुष्परिणामांवर तोडगा काढण्यापासून महिलांना त्यांची दैनंदिन दिनचर्या राखण्यास मदत करण्यापर्यंत जीवनमानाचा दर्जा जपणे हे महत्त्वाचे आहे. रुग्णाच्या सर्वांगीण स्वास्थ्यासह दीर्घकालीन आजार नियंत्रणाचा समतोल साधणारा सर्वसमावेशक दृष्टिकोन उपचारादरम्यान आणि उपचारानंतर देखील अधिक चांगले परिणाम मिळवण्यास मदत करू शकतो.”
शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि पद्धतशीर उपचार अर्ली ब्रेस्ट कॅन्सरच्या देखभालीमध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावतात. निदानावर अवलंबून उपचारांचे उद्दिष्ट ट्यूमर काढून टाकणे, शरीरात शिल्लक राहू शकणाऱ्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करणे आणि आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी करणे हे असू शकते.
पण, सुरुवातीचे उपचार यशस्वी झाल्यानंतरही काही वेळा आजार पुन्हा उद्भवू शकतो. हा कर्करोग स्तनात किंवा जवळच्या उतींमध्ये किंवा शरीराच्या इतर भागात विकसित होऊ शकतो. हा धोका प्रत्येक व्यक्तीनुसार मोठ्या प्रमाणात बदलतो आणि विविध घटकांवर अवलंबून असतो.
संशोधनामधून विशिष्ट रुग्णांच्या गटांमध्ये आजार पुन्हा उद्भवण्याचा धोका ५० टक्के जास्त असल्याचे समोर आले आहे. हा अर्ली ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या सर्व महिलांसाठी एकसमान अंदाज नाही. सुरुवातीच्या टप्प्यातील निदान म्हणजे आपोआप पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी असा निष्कर्ष काढण्याऐवजी रुग्णांनी आपला वैयक्तिक धोका समजून घेतला पाहिजे.
अनेक व्यक्ती कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचा संबंध उपचार संपल्यानंतर सुरुवातीच्या काळाशी जोडतात. पण, कॅन्सर काही वर्षांनंतरही परत येऊ शकतो. हे विशेषतः ठराविक प्रकारच्या हार्मोन रिसेप्टर-पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत लागू होते, जिथे हा धोका दीर्घकाळापर्यंत कायम राहू शकतो. याच कारणामुळे दृश्यमान ट्यूमर काढून टाकल्यानंतरही डॉक्टर शस्त्रक्रियेनंतर प्रगत थेरपींची शिफारस करू शकतात. निदानावर आधारित यामध्ये एंडोक्राइन थेरपी, केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी किंवा उपचारांच्या संयोजनाचा समावेश असू शकतो.
ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) केवळ आजार नाही. या कॅन्सरची जैविक वैशिष्ट्ये कॅन्सर वाढवण्यावर आणि उपचारांना प्रतिसाद देण्यावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे एकाच टप्प्यावर निदान झालेल्या दोन वेगवेगळ्या महिलांना वेगवेगळ्या उपचारांच्या शिफारशी मिळू शकतात.
ट्यूमरचा आकार आणि ग्रेड, लिम्फ नोड्सचा सहभाग इत्यादी घटकांना समजून घेतल्याने एखाद्या विशिष्ट उपचाराची शिफारस केली गेली आहे हे जाणून घेण्यास महिलांना मदत होऊ शकते. यामुळे अपेक्षित फायदे, संभाव्य दुष्परिणाम आणि उपलब्ध पर्यायांविषयीची चर्चा अधिक अर्थपूर्ण होऊ शकते.
कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी करणे महत्त्वाचे असले, तरी उपचारांचा दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो. थकवा, सांधेदुखी, झोपेच्या समस्या, मळमळ आणि मानसिक ताण यांचा काम, नातेसंबंध आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. काही महिलांना दीर्घकालीन दुष्परिणामांचाही सामना करावा लागू शकतो. महिलांना या आव्हानांचा सामना केवळ सहन करत राहावा लागेल, असे वाटू नये. त्यांच्या गरजांनुसार, त्यांची हेल्थकेअर टीम सपोर्टिव्ह केअर, औषधे, पोषणविषयक मार्गदर्शन, शारीरिक हालचाली किंवा समुपदेशनाची शिफारस करू शकते.
ब्रेस्ट कॅन्सरच्या देखभालीतील प्रगतीमुळे पात्र रुग्णांसाठीचे पर्याय विस्तारले आहेत, ज्यामध्ये टार्गेटेड थेरपी आणि विस्तारित सहाय्यक उपचार धोरणांचा समावेश आहे. हे योग्य रुग्णांच्या गटांमध्ये आजार पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. पण, कोणतेही निर्णय घेताना त्याचे पुरावा-आधारित फायदे, संभाव्य दुष्परिणाम आणि रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा यांचा विचार केला पाहिजे.
प्रकृती उत्तम वाटणे हे उत्साहवर्धक असले, तरी ते डॉक्टरांनी सुचवलेल्या फॉलो-अप केअरची जागा घेऊ शकत नाही. नियमित तपासण्या डॉक्टरांना प्रकृतीतील सुधारणेवर लक्ष ठेवण्यास, उपचारांच्या दुष्परिणामांवर तोडगा काढण्यास आणि नवीन समस्यांची तपासणी करण्यास मदत करतात. फॉलो-अप प्लॅन्समध्ये क्लिनिकल तपासण्या आणि योग्य ब्रेस्ट इमेजिंगचा समावेश असू शकतो.
महिलांनी कोणतीही नवीन किंवा सतत जाणवणारी लक्षणे डॉक्टरांना सांगितली पाहिजे, ती केवळ उपचारांचे दुष्परिणाम आहेत असे गृहीत धरून पुढील अपॉइंटमेंटपर्यंत वाट पाहू नये. या लक्षणांचा अर्थ कॅन्सर परत आला असा होत नाही, पण पुढील तपासणीची आवश्यकता आहे की नाही हे ठरवण्यासाठी वैद्यकीय तपासणी मदत करू शकते.
उपचार पूर्ण होणे हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि महिलांनी तो नक्कीच साजरा केला पाहिजे. पुन्हा उद्भवण्याचा धोका समजून घेणे, योग्य केअर प्लॅनचे पालन करणे आणि जीवनमानाच्या दर्जाशी संबंधित समस्यांवर मोकळेपणाने बोलणे यामुळे त्यांना पुढील वर्षांसाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. याचे उद्दिष्ट कॅन्सर परत येण्याच्या भीतीत जगणे हे नसून दीर्घकालीन आरोग्याबद्दल अधिक स्पष्टतेसह पुढे जाणे हे आहे.
Ans: होय, उपचारांनंतरही काही रुग्णांमध्ये कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो. याला कॅन्सर रिकरन्स (Cancer Recurrence) म्हणतात. मात्र, प्रत्येक रुग्णामध्ये असे होईलच असे नाही.
Ans: स्तनाच्या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास त्याला अर्ली ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात. या टप्प्यात कर्करोग स्तनापुरता मर्यादित असू शकतो किंवा जवळच्या लिम्फ नोड्सपर्यंत पसरलेला असू शकतो.
Ans: नियमित फॉलो-अपमुळे उपचारांनंतरच्या आरोग्याचा आढावा घेता येतो, औषधांचे दुष्परिणाम तपासता येतात आणि नवीन लक्षणांचे मूल्यांकन करता येते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्लिनिकल तपासणी आणि मॅमोग्राफी करणे महत्त्वाचे असते.






