(फोटो सौजन्य-AI एआय)
आजकाल अनेक लहान मुलींमध्ये वयाच्या अवघ्या ८ ते १० व्या वर्षीच मासिक पाळी सुरू होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. पूर्वी जिथे मुली साधारणपणे १३ ते १५ व्या वर्षी वयात येत असत, तिथे आता खूपच कमी वयात हे शारीरिक बदल दिसू लागले आहेत, असे संशोधानांवरून दिसून येते. वैद्यकीय भाषेत याला ‘प्री-कॉशस प्युबर्टी’ किंवा अकाली प्रौढत्व असे म्हणतात. यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा आणि विशेषतः लहान मुलांमधील मांसाहारी आहार हे एक प्रमुख कारण असल्याचे अनेक जागतिक संशोधनांमधून समोर आले आहे. एक पालक म्हणून नक्कीच तुम्हाला या गोष्टी भेडसावत असतील. याच्या मागचे कारण आणि उपाय आज आपण इथे पाहूयात.
मांसाहार आणि अकाली पाळी: काय सांगते वैज्ञानिक संशोधन?
लहान मुलांमधील मांसाहाराचे प्रमाण आणि मुलींच्या वयात येण्याचा काळ यावर जगभरात विविध अभ्यास झाले आहेत, ज्यामधील खालीलप्रमाणे काही,
१.युनिव्हर्सिटी ऑफ ब्राइटन आणि ब्रिस्टलचा अभ्यास (UK)
युकेमधील ‘चिल्ड्रन ऑफ द ९०ज’ या दीर्घकालीन अभ्यासाअंतर्गत ३,००० हून अधिक मुलींच्या आहाराचे परीक्षण करण्यात आले. यात असे दिसून आले की, ज्या मुली वयाच्या ३ आणि ७ व्या वर्षी आठवड्यातून १२ पेक्षा जास्त वेळा मांसाहार करत होत्या, त्यांच्यामध्ये वयाच्या १२.५ वर्षांपूर्वीच पाळी सुरू होण्याची शक्यता ४९% होती. याउलट, कमी मांसाहार करणाऱ्या मुलींमध्ये हे प्रमाण केवळ ३५% होते.
२.युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचे संशोधन (USA):
‘पब्लिक हेल्थ न्युट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, ज्या मुलींच्या आहारात रेड मीट चे प्रमाण जास्त असते, त्यांना कमी मांसाहार करणाऱ्या मुलींच्या तुलनेत सरासरी ५ महिने आधी मासिक पाळी येते.
मांसाहारामुळे अकाली वयात येण्यामागची मुख्य कारणे
१. अतिजास्त ॲनिमल प्रोटीन आणि IGF-1:
मांसातून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्राणिजन्य प्रोटिन्समुळे शरीरात ‘इन्सुलिन-लाइक ग्रोथ फॅक्टर-१’ (IGF-1) या हार्मोनची पातळी वाढते. हे हार्मोन शरीराची वाढ जलद गतीने करते आणि मेंदूला वेळेआधी वयात येण्याचे संकेत देते.
२. पोल्ट्री आणि फार्ममधील कृत्रिम हार्मोन्स:
आजकाल मार्केटमधील फार्म्समध्ये कोंबड्या आणि जनावरांची वाढ वेगाने व्हावी यासाठी अनेकदा स्टिरॉइड्स, ग्रोथ हार्मोन्स आणि प्रतिजैविकांचा वापर केला जातो. असा मांसाहार लहान मुलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन या स्त्री-हार्मोनचा समतोल बिघडवतो.
३. शरीरातील अतिरिक्त चरबी आणि इस्ट्रोजेन:
मांसाहारामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. यामुळे मुलांचे वजन वेगाने वाढते. शरीरातील फॅट सेल्स अँड्रोस्टेनेडिओनचे रूपांतर इस्ट्रोजेनमध्ये करतात. इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढल्याने स्तनांचा विकास वेगाने होतो आणि मासिक पाळी वेळेआधीच सुरू होते.
मुलींच्या मासिक पाळीवर आणि आरोग्यावर होणारे परिणाम
अनियमित मासिक पाळी आणि वेदना: कमी वयात गर्भाशय आणि हार्मोन्सची प्रणाली पूर्ण विकसित झालेली नसते. त्यामुळे वेळेआधी पाळी आल्यास तीव्र पोटदुखी, जास्त रक्तस्त्राव किंवा अनियमित पाळीचा त्रास होतो.
पीसीओएस (PCOS/PCOD) चा धोका: बालपणात हार्मोन्सचा समतोल बिघडल्यामुळे पौगंडावस्थेत पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) होण्याचा धोका वाढतो.
उंची खुंटणे: वयात आल्यानंतर शरीरातील हाडांची वाढ बंद होतात. त्यामुळे लहान वयात पाळी आल्यास मुलींची उंची पूर्ण वाढण्याआधीच थांबते.
मानसिक ताण आणि भीती: अवघ्या ८ ते १० वर्षांच्या बालिकेला पाळीशी संबंधित शारीरिक व मानसिक बदल हाताळणे कठीण जाते. यामुळे चिडचिड, भीती आणि डिप्रेशनची लक्षणे दिसू शकतात.
भविष्यातील गंभीर आजार: संशोधकांच्या मते, ज्या मुलींना अतिशय लहान वयात पाळी येते, त्यांना मोठेपणी स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि हृदयविकार होण्याचा धोका अधिक असतो.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
प्रमाणबद्ध मांसाहार: मांसाहातून लोह आणि झिंक यांसारखी आवश्यक पोषक तत्वे मिळतात, त्यामुळे मांसाहार पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र, आठवड्यातून १-२ वेळापेक्षा जास्त मांसाहार देणे टाळावे.
माशांचा समावेश: संशोधनानुसार, ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले मासे खाणाऱ्या मुलींमध्ये पाळी वेळेआधी येण्याचा धोका कमी असतो.
फायबर आणि भाज्यांचे प्रमाण वाढवणे: आहारात पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये आणि वनस्पतीजन्य प्रथिनांचा म्हणजेच प्लांट बेस्ड प्रोटीन्सचा समावेश करावा.
शारीरिक हालचाली: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लहान मुलांना रोज किमान ४५ ते ६० मिनिटे मैदानी खेळ किंवा व्यायाम करायला लावावा.






