फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्हाला वारंवार थकवा, सुस्ती किंवा पचनाशी संबंधित समस्या जाणवत असतील, तर त्याचे मूळ कारण तुमचा सकाळचा नाश्ता असू शकतो. नाश्ता हे दिवसातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे जेवण मानले जाते. साधारणपणे १० ते १२ तासांच्या दीर्घ उपवासानंतर आपण नाश्ता करतो. त्यामुळे सकाळी आपण काय आणि किती खातो, याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या ऊर्जा पातळीवर, एकाग्रतेवर आणि मेटाबॉलिझमवर होतो.
अनेकदा लोक नाश्ता टाळतात किंवा पोषणमूल्ये नसलेले पदार्थ खातात. याचा परिणाम म्हणजे दिवसभर थकवा, चिडचिड, अशक्तपणा आणि पचनाचे विकार. सकस आणि संतुलित नाश्ता केल्यास शरीराला आवश्यक प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि वारंवार भूक लागण्याची सवय कमी होते.
एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विमल छाजेड यांच्या मते, सकाळचे पहिले जेवण संपूर्ण दिवसासाठी शरीर कशी प्रतिक्रिया देईल, हे ठरवते. काही पदार्थ रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळते आणि अनेक आजारांपासून संरक्षण होते. सतत थकवा जाणवत असेल किंवा पोटाच्या तक्रारी असतील, तर हे चार सुपरफूड्स शरीरासाठी ‘पॉवर बँक’ ठरू शकतात.
ओट्स हे आजच्या काळातील सर्वाधिक आरोग्यदायी नाश्त्यांपैकी एक मानले जातात. त्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. ओट्समध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात, जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. रात्री ओट्स पाण्यात भिजवून सकाळी दही, स्किम्ड दूध किंवा बदाम दुधासोबत खाऊ शकता.
मूग, चणे किंवा राजमा यांसारख्या डाळी भिजवून किंवा मोड आणून खाल्ल्यास त्यांचा मोठा फायदा होतो. या पदार्थांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. मोड आलेल्या कडधान्यात व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण वाढते, जे पचन सुधारण्यास आणि गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. रात्री जिरे पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिल्यास पोट फुगणे, गॅस, उलटी किंवा जुलाब यासारख्या त्रासांवर फायदा होतो. जिरे यकृत मजबूत करतात आणि पचनसंस्था अधिक सक्रिय ठेवतात. यामध्ये लोह आणि कॅल्शियमही असते, जे शरीरासाठी आवश्यक आहे.
रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी प्यायल्यास शरीराला नैसर्गिकरीत्या कॉपर मिळतो. कॉपर हा एक आवश्यक सूक्ष्म घटक असून तो हिमोग्लोबिन वाढवण्यास, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी उपयुक्त मानला जातो.सकाळचा नाश्ता केवळ पोट भरण्यासाठी नसून, संपूर्ण दिवस निरोगी आणि उत्साही ठेवण्याचा पाया आहे. योग्य आणि पौष्टिक नाश्ता केल्यास थकवा, अशक्तपणा आणि पचनाच्या समस्या दूर ठेवता येतात.






