
या बदलामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय आणि इतर आशियाई लोकांमध्ये शरीरातील चरबीचे वितरण वेगळ्या पद्धतीने होत असते. एखाद्या व्यक्तीचा बीएमआय (BMI) सामान्य असला, तरीही त्यांच्या पोटाभोवती आणि अंतर्गत अवयवांभोवती अतिरिक्त चरबी साचलेली असू शकते. या चरबीला व्हिसेरल (Visceral) किंवा सेंट्रल ओबेसिटी (Central Obesity) असे म्हटले जाते. ही चरबी शरीरात दाह (Inflammation), इन्सुलिन रेझिस्टन्स आणि यकृतामध्ये चरबी साचण्यास कारणीभूत ठरू शकते.
या स्थितीला आता लीन मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिएटोटिक लिव्हर डिसीज (Lean MASLD) म्हणून ओळखले जाते. या प्रकारात लठ्ठपणा नसतानाही यकृतामध्ये चरबी साचते. जरी हा प्रकार जास्त वजन असलेल्या लोकांमधील फॅटी लिव्हरइतका सामान्य नसला, तरी भारतीयांमध्ये तो अजिबात दुर्मिळ नाही. सामान्य बीएमआय असलेल्या व्यक्तीलाही चयापचयाशी संबंधित (Metabolic) धोका असू शकतो, विशेषतः जर त्यांचे पोट पुढे आलेले असेल किंवा कंबरेचा घेर जास्त असेल.
यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील चयापचयातील (Metabolic) असंतुलन. वजन सामान्य असले तरी चरबीचे चयापचय बिघडणे आणि विशेषतः “वाईट” कोलेस्टेरॉल (LDL) वाढणे, यामुळे यकृताच्या पेशींमध्ये चरबी साचू शकते. याशिवाय, अयोग्य आहार, निष्क्रिय जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि दीर्घकालीन ताणतणाव यामुळेही हा धोका वाढतो.
फॅटी लिव्हरची सर्वात मोठी अडचण म्हणजे हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाही. अनेकदा नियमित आरोग्य तपासणी, नोकरीपूर्व वैद्यकीय तपासणी किंवा इतर कारणांसाठी केलेल्या इमेजिंग चाचण्यांदरम्यान तो योगायोगाने आढळतो. यकृताचे नुकसान होत असतानाही सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे अनेकांना या आजाराची कल्पनाही नसते.
वेळीच निदान किंवा उपचार न झाल्यास फॅटी लिव्हर पुढे जाऊन मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिएटोहेपेटायटिस (MASH) या गंभीर दाहयुक्त यकृताच्या आजारात रूपांतरित होऊ शकतो. त्यामुळे यकृतामध्ये फायब्रोसिस, सिरोसिस आणि अत्यंत गंभीर अवस्थेत लिव्हर फेल्युअरचा धोका निर्माण होऊ शकतो.
फॅटी लिव्हरचे निदान झालेल्या प्रत्येक रुग्णामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलमधील बिघाड यांसारख्या इतर चयापचयाशी संबंधित आजारांचीही तपासणी करणे आवश्यक आहे, जरी त्यांचे निदान यापूर्वी झालेले नसले तरी.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते. फॅटी लिव्हर हा केवळ लठ्ठ व्यक्तींचाच आजार नाही. वजन सामान्य असणे म्हणजे यकृत पूर्णपणे निरोगी आहे, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी, चयापचयाशी संबंधित तपासण्या आणि विशेषतः कंबरेच्या घेरावर लक्ष ठेवणे, यामुळे फॅटी लिव्हरचे लवकर निदान होऊन भविष्यातील गंभीर यकृतविकार टाळता येऊ शकतात.
Eye Health: स्क्रीन टाईम वाढलाय? डोळ्यांच्या आरोग्यासाठी खा ‘हे’ सुपरफूड्स; आहारात करा समावेश