फोटो सौजन्य - Social media
आपल्या दैनंदिन आहारातूनच शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतात. पण अनेकदा आपल्याला वाटतं आपण सकस आणि पौष्टिक जेवण घेत आहोत, तरीही शरीरात काही पोषणतत्त्वांची कमतरता राहते. हे जाणवण्याचं काम शरीर आपल्याला काही खास लक्षणांच्या माध्यमातून सांगत असतं. खाली दिलेली ६ लक्षणं लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या आहारात योग्य बदल करू शकता.
तोंडाच्या कोपऱ्यांवर भाजल्यासारखी भेग (Angular Cheilitis):
जर तोंडाच्या कोपऱ्यांवर भेगा दिसत असतील, त्वचा लालसर होत असेल, तर हे एंग्युलर चाइलायटिस असू शकते. ही स्थिती व्हिटॅमिन B12, फोलेट, रायबोफ्लेविन (B2), लोह (Iron) आणि झिंकच्या कमतरतेमुळे होते.
हात-पाय सुन्न होणे किंवा सुई टोचल्यासारखं वाटणं:
असं वाटणं म्हणजे ‘पेरीफेरल न्यूरोपथी’चे लक्षण असू शकतं. विशेषतः व्हिटॅमिन B6, B12, थायमिन (B1), रायबोफ्लेविन यांच्या कमतरतेमुळे ही समस्या होऊ शकते.
जीभ लालसर आणि सुजलेली दिसणे (Glossitis):
शरीरात जर B व्हिटॅमिन्स आणि लोह कमी असेल, तर जीभ लालसर, गुळगुळीत व सुजलेली होऊ शकते. हे विशेषतः व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचं लक्षण आहे.
कायमची थकवा जाणवणे:
जर तुम्ही भरपूर झोपूनही थकलेलेच वाटत असाल, तर त्यामागे व्हिटॅमिन C, B ग्रुप व्हिटॅमिन्स, झिंक, मॅग्नेशियम आणि आयर्नची कमतरता असू शकते. शरीरात ऊर्जा येण्यासाठी ही पोषणतत्त्वे अत्यंत आवश्यक आहेत.
जखमा लवकर न भरल्यास:
जखमा भरताना शरीराला कोलेजनची आवश्यकता असते. कोलेजन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन C आणि झिंक गरजेचे असतात. तसेच, B व्हिटॅमिन्स, झिंक आणि आयर्न नव्या पेशी तयार करण्यात आणि टिशू रिपेअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
वारंवार सर्दी, त्वचा कोरडी पडणे:
हे सुद्धा पोषणतत्त्वांच्या कमतरतेचे संकेत आहेत. व्हिटॅमिन A, C आणि झिंकची कमतरता असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि त्वचेवरही परिणाम होतो.