पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड–दक्षिण आफ्रिका भिडणार (Photo Credit- X)
टी-२० फॉरमॅटमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास दक्षिण आफ्रिकेचे पारडे न्यूझीलंडच्या तुलनेत जड दिसते. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १९ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी १२ सामन्यांत दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला केवळ ७ सामन्यांत विजय संपादन करता आला आहे.
विश्वचषकाच्या इतिहासातही दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व एकतर्फी राहिले आहे. आतापर्यंत विश्वचषकात हे दोन्ही संघ ५ वेळा आमनेसामने आले असून, पाचही वेळा दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे. मात्र, हे सर्व सामने साखळी फेरीतील होते. टी-२० विश्वचषकाच्या ‘नॉकआउट’ फेरीत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.
न्यूझीलंडने आतापर्यंत सर्व टी-२० विश्वचषकांमध्ये सहभाग नोंदवला आहे. संघ तीन वेळा उपांत्य फेरीतून बाहेर पडला असून एकदा त्यांना अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेलाही अद्याप एकदाही हे जेतेपद पटकावता आलेले नाही. २०१४ आणि २००९ मध्ये त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता, तर २०२४ मध्ये भारताने अंतिम सामन्यात त्यांचा पराभव केला होता.
एडेन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने २०२६ च्या विश्वचषकात आतापर्यंत अजिंक्य राहण्याची कामगिरी केली आहे. सुपर-८ फेरीत भारत, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांना धूळ चारून त्यांनी दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार एडेन मार्करम जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने ७ सामन्यांत १७५ च्या स्ट्राईक रेटने २६८ धावा कुटल्या आहेत. रयान रिकेल्टननेही २२८ धावांचे योगदान दिले आहे, तर क्विंटन डी कॉक पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात करून देत आहे. लुंगी एनगिडीने ६ सामन्यांत १२ बळी घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणले आहे. त्याला कॉर्बिन बॉशची (११ बळी) उत्तम साथ मिळत आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही उत्कृष्ट लयीत दिसत आहे. रचिन रवींद्र हा फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत आहे. टिम सीफर्टने ६ सामन्यांत १५७ च्या स्ट्राईक रेटने २१६ धावा केल्या आहेत. मधल्या फळीत ग्लेन फिलिप्सने अनेकदा डाव सावरण्याची भूमिका चोख बजावली आहे. मिचेल सँटनर, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन हे त्रिकूट दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी आव्हान ठरू शकते. ईडन गार्डन्सच्या फिरकीला पूरक असणाऱ्या खेळपट्टीवर दोन्ही संघांचे फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. या हाय-व्होल्टेज सामन्यात कोणता संघ बाजी मारून फायनलचे तिकीट मिळवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






