साहित्य:
३/४ कप मैदा
१/४ कप रवा
१ चमचा तूप मोहनासाठी
चिमुटभर मीठ
अंदाजे १/४ कप दुध
३ ते ४ चमचा तूप, वितळलेले
२ ते ३ चमचा कॉर्न फ्लोअर
तूप किंवा तेल चिरोटे तळण्यासाठी
१ कप साखर + ३ ते ४ चमचा पाणी, गोळीबंद पाकासाठी
कृती:
रवा आणि मैदा एका बाउलमध्ये घ्यावे. त्यात १ चमचा कडकडीत गरम तूप घालावे. चिमूटभर मीठ घालून चमच्याने मिक्स करावे. अंदाज घेउन दुध घालावे आणि मध्यमसर घट्ट असा गोळा भिजवावा. २० मिनिटे झाकून ठेवावे. २० मिनिटांनी भिजवलेल्या गोळ्याचे ६ सारखे भाग करावे. त्यातील ३ भाग घेउन बाकीचे ३ भाग नंतरसाठी झाकून ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पातळसर पोळी लाटावी. लाटताना शक्यतो नुसतीच लाटावी, पीठ घेउ नये.
२ ते ३ टेस्पून तूप वितळवावे. त्यात २ ते ३ चमचा कॉर्न फ्लोअर घालून पेस्ट बनवावी. हि पेस्ट पातळसर असावी जेणेकरून ती पोळीवर व्यवस्थित पसरेल.
पोळपाटावर १ लाटलेली पोळी घ्यावी. त्यावर बनवलेली पेस्ट पसरावी. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेवावी. या पोळीवर तुप-कॉर्न फ्लोअरची पेस्ट लावावी. वर तिसरी पोळी ठेवून उरलेली पेस्ट यावर लावावी. दोन विरुद्ध बाजूंनी गुंडाळी करत मध्यभागी आणाव्यात. मग एक गुंडाळी दुसरीवर ठेवून घट्ट रोल बनवावा. वरून थोडा दाब द्यावा. अशाप्रकारे उरलेल्या तीन पोळ्या बनवून रोल बनवावा. थोडावेळ न झाकता तसेच ठेवावे म्हणजे तूप थोडे गोठेल आणि रोल हाताळण्यायोग्य होईल.
मधल्या वेळेत साखर आणि पाणी एकत्र करून गोळीबंद पाक करावा. आच बंद करावी. जेव्हा दोन्ही रोल थोडे सुकतील, तेव्हा कढईत तूप गरम करावे. रोलचे १ इंचाचे तुकडे करावे. एक तुकडा घेउन लेयर असलेली बाजू वर अशाप्रकारे ठेवून हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून साधारण अडीच इंचाची पुरी बनवावी. अशाप्रकारे सर्व चिरोटे बनवावे. तयार झालेले चिरोटे तुपात मंद आचेवर तळावे.
चिरोटे बदामी रंगावर तळून घ्यावे. तळलेले चिरोटे स्टीलच्या चाळणीत उभे करावे म्हणजे अधिकचे तूप गळून चाळणीत जमेल. जेव्हा चिरोटा थोडा कोमट होईल तेव्हा चिरोटा साधारण गरम असलेल्या पाकात घालावा. मिनिटभर ठेवून बाहेर काढावा. आणि उभा करून ठेवावा. चिरोटे एकावर न ठेवता थोडे सेपरेट ठेवावेत. चिरोटे गार झाले कि वर पाकाचे छान ग्लेझिंग येते.