अपुरी झोप, तणाव आणि बैठ्या जीवनशैलीचा पुरुषांच्या आरोग्यावर कसा परिणाम करत आहे? जाणून घेऊया तज्ज्ञांनी दिलेली माहिती
Mental Health: आधुनिक जीवनशैलीमध्ये सतत काम करत राहणे आणि अधिकाधिक उत्पादक राहणे याला महत्त्व दिले जाते. मात्र, या कामाच्या धावपळीमागे पुरुषांच्या आरोग्याशी संबंधित एक गंभीर समस्या वाढत आहे. दीर्घकाळ राहणारा तणाव, अपुरी झोप आणि सतत बसून राहण्याची सवय या तीन गोष्टी पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला हळूहळू हानी पोहोचवत आहेत. परिणामी, टाळता येण्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. याविषयावर डॉ. अबिझर मांकेड, सल्लागार फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट, सैफी हॉस्पिटल, मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
झोप ही शरीराच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी अत्यंत आवश्यक असते. मात्र, व्यस्त दिनक्रमात सर्वप्रथम झोपेकडेच दुर्लक्ष केले जाते. पुरुषांमध्ये दीर्घकाळ अपुरी झोप झाल्यास शरीरातील हार्मोन्सच्या कार्यावर थेट परिणाम होतो. संशोधनानुसार, केवळ एका आठवड्यापर्यंत झोपेवर मर्यादा आल्यास टेस्टोस्टेरॉनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. त्यामुळे एखाद्या पुरुषाचे हार्मोनल प्रोफाइल त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी अधिक वय असलेल्या पुरुषासारखे दिसू शकते. याचा परिणाम केवळ लैंगिक इच्छा आणि स्नायूंच्या वस्तुमानावर होत नाही, तर शरीरात चरबी साठण्याची प्रक्रियाही वेगाने वाढू शकते. याशिवाय, शरीराला आवश्यक असलेली शांत आणि पुरेशी झोप न मिळाल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो आणि दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.
दीर्घकालीन तणावामुळे ही समस्या आणखी गंभीर बनते. अल्पकालीन तणाव ही शरीराची नैसर्गिक संरक्षणात्मक यंत्रणा असली, तरी दररोजच्या कामाचा आणि जीवनातील दबावाचा सतत सामना करावा लागल्यास शरीरातील तणावाची पातळी वाढलेली राहते. कॉर्टिसोल या तणावाशी संबंधित हार्मोनची पातळी वाढल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. तसेच रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींमध्ये दाह निर्माण होऊ शकतो. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जगभरात पुरुषांच्या मृत्यूमागील प्रमुख कारणांपैकी हृदयविकार हे एक महत्त्वाचे कारण आहे. याशिवाय, सामाजिक अपेक्षांमुळे अनेक पुरुष आपल्या मानसिक समस्या किंवा तणावाबद्दल कोणाशीही बोलणे टाळतात. परिणामी, नियंत्रणात न आलेला तणाव दडपलेली चिंता, नैराश्य किंवा तीव्र मानसिक आणि शारीरिक थकव्याच्या स्वरूपात समोर येऊ शकतो.
बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक आरोग्याचे नुकसान आणखी वाढते. डेस्कवर बसून करावे लागणारे काम आणि स्क्रीनसमोर घालवला जाणारा मोकळा वेळ यामुळे अनेक पुरुष दिवसभरातील बहुतांश वेळ बसूनच घालवतात. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावते आणि इन्सुलिनबाबत शरीराची संवेदनशीलता कमी होते. परिणामी, मेटाबॉलिक सिंड्रोम, पोटाभोवती अंतर्गत चरबी वाढणे आणि टाइप 2 मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, संशोधनानुसार सलग दहा तास बसून राहिल्यामुळे होणारे नुकसान केवळ एक तास व्यायामशाळेत व्यायाम करून पूर्णपणे भरून काढता येत नाही.
या तिन्ही घटकांचा सर्वाधिक गंभीर परिणाम म्हणजे ते एकमेकांशी जोडलेले असून एकमेकांची तीव्रता वाढवतात. जास्त तणावामुळे झोपेवर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर थकवा जाणवतो आणि शारीरिक हालचाली करण्याची इच्छाही कमी होते. परिणामी, शारीरिक निष्क्रियता वाढते आणि त्यामुळे चिंता व तणावाची पातळी आणखी वाढते.
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी जीवनशैलीत मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे, कामाच्या वेळेत नियमित अंतराने उठून थोडे चालणे किंवा हालचाल करणे आणि तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे याला प्राधान्य दिले पाहिजे. या गोष्टी केवळ आरोग्य सुधारण्यासाठीचे पर्याय किंवा सध्याचे ट्रेंड नसून पुरुषांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी अत्यावश्यक आहेत.
Ans: अपुऱ्या झोपेमुळे थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ झोप अपुरी राहिल्यास हृदयविकार आणि मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो.
Ans: होय. दीर्घकाळ मानसिक तणाव राहिल्यास शरीरातील कॉर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढू शकते. याचा टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर आणि लैंगिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
Ans: दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो.






