रक्तातील साखरेपलीकडे: मधुमेहाचा पुरुषांच्या लैंगिक, हार्मोनल आणि हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम
Diabetes In Men: मधुमेहाबाबत चर्चा करताना प्रामुख्याने रक्तातील साखरेची पातळी, आहारावरील निर्बंध आणि औषधोपचार यांवर भर दिला जातो. मात्र, मधुमेहाचे परिणाम केवळ रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यापुरते मर्यादित नसतात. पुरुषांच्या आरोग्याच्या अनेक पैलूंवर मधुमेहाचा परिणाम होऊ शकतो. लैंगिक कार्यक्षमतेतील बदल, हार्मोन्सचे असंतुलन तसेच हृदयविकाराचा वाढलेला धोका अशा अनेक समस्यांना पुरुषांना सामोरे जावे लागू शकते. यापैकी अनेक विषयांवर मात्र खुलेपणाने चर्चा केली जात नाही. याविषयी डॉ. अरविंद बदिगर, टेक्निकल डायरेक्टर, बीडीआर फार्मास्युटिकल्स इंटरनॅशनल प्रा. लि.यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
समस्या हळूहळू विकसित होत असल्याने त्यांचे गांभीर्य अनेकदा लक्षात येत नाही. सतत जाणवणारा थकवा, लैंगिक इच्छेमध्ये घट किंवा शारीरिक क्षमता कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे पुरुष अनेकदा वाढते वय किंवा कामाचा ताण यांचा परिणाम म्हणून पाहतात. मात्र, ही लक्षणे शरीरातील चयापचय प्रक्रियेत (मेटाबॉलिझम) होणाऱ्या बदलांमुळेही उद्भवू शकतात, हे त्यांच्या लक्षात येत नाही.
पुरुषांमध्ये मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या समस्यांपैकी इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction – ED) ही एक महत्त्वाची, मात्र फारशी चर्चिली न जाणारी समस्या आहे. दीर्घकाळ रक्तातील ग्लुकोजची पातळी जास्त राहिल्यास लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंवर परिणाम होऊ शकतो.
लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होणे आवश्यक असते. त्याचबरोबर मज्जासंस्थेचे कार्यही सुरळीत असणे गरजेचे असते. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या किंवा मज्जातंतूंचे नुकसान झाल्यास लिंगामध्ये ताठरता येण्यास किंवा ती टिकवून ठेवण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
मधुमेह नसलेल्या पुरुषांच्या तुलनेत मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या अधिक प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे, मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये ही समस्या कमी वयातही उद्भवू शकते. मात्र, इरेक्टाइल डिसफंक्शन ही केवळ लैंगिक आरोग्याशी संबंधित समस्या नाही. काही वेळा ती हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांची सुरुवातीची धोक्याची सूचना ठरू शकते.
मधुमेह, विशेषतः टाइप २ मधुमेहाचा काही पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या पुरुष संप्रेरकाच्या (हार्मोन) कमी पातळीशीही संबंध आढळून आला आहे. या स्थितीचा संबंध प्रामुख्याने इन्सुलिन रेझिस्टन्स (इन्सुलिन प्रतिरोधकता) आणि लठ्ठपणाशी असतो. हे दोन्ही घटक टाइप २ मधुमेहामध्ये अनेकदा दिसून येतात.
वैद्यकीय तपासण्यांमधून टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असल्याचे निश्चित झाल्यास लैंगिक इच्छेमध्ये घट, थकवा, मनःस्थिती खालावणे आणि स्नायूंचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र, ही लक्षणे केवळ हार्मोनच्या कमतरतेमुळेच उद्भवतात असे नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी या लक्षणांचे कारण टेस्टोस्टेरॉनची कमी पातळी आहे, असे गृहीत धरू नये.
पुरुषांमध्ये अशी लक्षणे दीर्घकाळ कायम राहिल्यास योग्य वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये सकाळच्या वेळी टेस्टोस्टेरॉनची पातळी तपासण्याचाही समावेश असू शकतो. तपासणीत टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी आढळल्यास निदान किंवा उपचारांचा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा तपासणी करून त्याची खात्री करणे आवश्यक असते. टेस्टोस्टेरॉन थेरपी हा मधुमेहावरील नियमित उपचार नाही. वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असल्यासच तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही थेरपी दिली पाहिजे.
मधुमेहाचा हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर होणारा परिणामही गंभीर असतो. दीर्घकाळ रक्तातील साखरेची पातळी जास्त राहिल्यास रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते आणि अॅथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) ही स्थिती निर्माण होऊ शकते. या स्थितीमध्ये रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर चरबीचे थर साचू लागतात. परिणामी, कोरोनरी आर्टरी डिसीज (हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार), हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात (स्ट्रोक) यांचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलची असामान्य पातळी, धूम्रपान आणि पोटाभोवती वाढलेली चरबी यांसारखे इतर घटक हृदयविकाराचा धोका आणखी वाढवू शकतात. त्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन म्हणजे केवळ रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवणे नव्हे, तर संपूर्ण आरोग्याची काळजी घेणे होय.
पुरुषांनी दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने मधुमेहाच्या व्यवस्थापनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. रक्तातील ग्लुकोज, रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मूत्रपिंडांच्या कार्याची नियमित तपासणी करणे, शारीरिक हालचाली वाढवणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे यामुळे मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतींचा धोका कमी करता येऊ शकतो.
त्याचप्रमाणे, इरेक्टाइल डिसफंक्शन, लैंगिक इच्छेमध्ये घट किंवा सतत जाणवणारा थकवा यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी मोकळेपणाने चर्चा करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा विषयांवर बोलणे काही पुरुषांना संकोचाचे वाटू शकते. मात्र, वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यास योग्य उपचार करणे शक्य होते.
Ans: होय. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढलेले राहिल्यास रक्तवाहिन्या आणि नसांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे लैंगिक क्षमता कमी होणे आणि इरेक्टाइल डिसफंक्शनसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Ans: होय. टाइप २ मधुमेह आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा संबंध टेस्टोस्टेरॉनच्या कमी पातळीशी असू शकतो. मात्र प्रत्येक मधुमेही पुरुषामध्ये ही समस्या दिसून येतेच असे नाही.
Ans: मधुमेहामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.






