नवी दिल्ली : आधीच महागाईचे चटके बसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एक झळ बसणार आहे. देशातील खासगी टेलिकॉम सेक्टरच्या टॉप तीन टेलिकॉम कंपन्या चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत पुन्हा एकदा आपला टॅरिफ प्लान वाढवण्याची शक्यता आहे. मंगळवारी जारी केलेल्या एका रिपोर्टमधून याची माहिती समोर आली आहे.
आर्थिक वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये या कंपन्या २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. कंपन्यांच्या या टॅरिफ प्लानमध्ये वाढ झाल्यानंतर यूजर्संना रिचार्जसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. आधीच भरमसाठी दर वाढल्यानंतर कंपन्या पुन्हा एकदा प्लानच्या किमतीत वाढ करणार आहे.
रेटिंग एजन्सी क्रिसिलचा रिपोर्ट
रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले की, उद्योगासाठी नेटवर्क आणि स्पेक्ट्रम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी यूजर्स सरासरी मिळकतीत वाढ होणे गरजेचे आहे. जर असे केले नाही तर सेवेची गुणवत्ता खराब होऊ शकते. रिलायन्स जिओ आल्यानंतर सुरू झालेली वेगवान स्पर्धेनंतर उद्योगाने डिसेंबर २०१९ पासून शुल्क दरात वाढ सुरू केली आहे.
१५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत
रिपोर्टच्या माहितीनुसार, देशातील टॉप तीन कंपन्यांच्या आर्थिक मिळकतीत चालू आर्थिक वर्षादरम्यान २० ते २५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, २०२१ ते २०२२ मध्ये प्रतियूजर्सची सरासरी मिळकत (एआरपीयू) मध्ये पाच टक्क्यांची वाढ केल्यानंतर आता २०२२ आणि २०२३ मध्ये १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे.






