फोटो सौजन्य - Social Media
साऊथ आफ्रिकन टूरिझमने भारतातील पर्यटन बाजारपेठेसोबत संबंध अधिक दृढ करण्यासाठी २०२५ च्या इंडिया रोडशोची घोषणा केली आहे. भारतातील प्रवाशांसाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या रोडशोचे आयोजन करण्यात आले आहे. हा इव्हेण्ट १८ ते २० मार्चदरम्यान दिल्ली, चेन्नई आणि मुंबई येथे होणार आहे. या वर्षीच्या इंडिया रोडशोमध्ये दक्षिण आफ्रिकेतील पर्यटन क्षेत्राशी संबंधित ४० हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील, ज्यात लहान आणि मध्यम व्यवसायांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, यामध्ये १५% नवीन उत्पादने आणि संकल्पना सादर केल्या जातील, जेणेकरून भारतीय पर्यटकांना अधिक आकर्षक पर्याय उपलब्ध होतील.
साऊथ आफ्रिकन टूरिझमच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारतातून ७५,५४१ पर्यटक दक्षिण आफ्रिकेला गेले. ही संख्या कोविडपूर्व पातळीच्या तुलनेत ७९% वाढ दर्शवते. यंदाच्या रोडशोमध्ये २०२५ मध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत १६% वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. साऊथ आफ्रिकन टूरिझमचे प्रादेशिक महाव्यवस्थापक श्री. गकोबानी मॅन्कोटीवा म्हणाले, “भारतीय प्रवासी बाजारपेठ आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी रोडशोमध्ये १२,००० हून अधिक व्यापार बैठकांचे आयोजन झाले, ज्यातून १,६०,००० हून अधिक व्यावसायिक संधी निर्माण झाल्या. यंदाही आम्ही आमच्या पर्यटन भागीदारांसोबत नवीन संधी शोधण्यास उत्सुक आहोत.”
दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डी लिल यांनी भारतीय प्रवाशांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन (eTA) प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे भारतीय प्रवाशांना ऑनलाइन माध्यमातून सोपी आणि वेगवान व्हिसा सेवा मिळेल, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला जाण्यास इच्छुक पर्यटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. तसेच, ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम (TTOS) पोर्टलच्या मदतीने ग्रुप व्हिसा अर्ज प्रक्रियेतही अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता येणार आहे, ज्यामुळे प्रवासी गटांना एकत्रितपणे अर्ज करणे सोपे होईल.
२०२५ मध्ये दक्षिण आफ्रिका आपल्या पर्यटन धोरणात महत्त्वपूर्ण बदल करत साहसी पर्यटन, लक्झरी ट्रॅव्हल, कौटुंबिक पर्यटन आणि MICE (Meetings, Incentives, Conferences, and Exhibitions) समूहांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. भारतीय पर्यटकांमध्ये व्यवसाय प्रवास करण्याचा कल वाढत असून, सध्याच्या आकडेवारीनुसार २०.२% भारतीय प्रवासी MICE प्रवासासाठी आणि २९.४% व्यावसायिक प्रवासासाठी दक्षिण आफ्रिकेला जात आहेत. त्यामुळे या प्रवासी विभागांसाठी नवीन सुविधा, उत्तम संधी आणि विशेष सेवा देण्याचा साऊथ आफ्रिकन टूरिझमचा मानस आहे.
याशिवाय, २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिका G20 अध्यक्षपद स्वीकारणार असल्याने जागतिक स्तरावर पर्यटन आणि व्यापार वाढीसाठी नवे प्रयत्न करण्यात येणार आहेत. याअंतर्गत, आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे, शाश्वत पर्यटनाला चालना देणे आणि दोन्ही देशांमधील व्यापार संधी वाढवणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. भारत ही दक्षिण आफ्रिकेसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ असल्याने, या देशात पर्यटन वाढवण्यासाठी आणि प्रवासी व्यापार अधिक बळकट करण्यासाठी ‘More & More’ ब्रँड मोहिमेसह विविध नवकल्पनांचा समावेश करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत दक्षिण आफ्रिकेचे नैसर्गिक सौंदर्य, वन्यजीवन सफारी, लक्झरी रिसॉर्ट्स आणि अनोख्या प्रवासी अनुभवांना प्राधान्य दिले जाणार आहे, ज्यामुळे भारतीय पर्यटकांचा कल अधिक प्रमाणात वाढू शकतो.