सौजन्य - सोशल मिडीया
गेल्या आठवड्यात महापाैर, उपमहापाैर निवडणुकीसाठी नवाेदित सभागृहाची पहीली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी नवाेदीत आणि जुन्या नगरसेवकांकडून अनेक संकेत पाळले गेले नाही. याविषयी माजी महापाैर प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत खंत व्यक्त केली. महापालिकेचे सभागृहातील संकेत हे पाळले गेले पाहीजे. काेणीही उठते, बाहेर जाते, काेण गाॅगल घालून सभागृहात येते असे प्रकार घडत आहे. वास्तविक महापाैर आसनावर असताना, त्यांना बाहेर जाताना किंवा सभागृहात येताना नमस्कार करणे आवश्यक आहे. तसेच महापाैर सभागृहात आल्यानंतर सर्व सदस्यांनी उभे राहणे गरजेचे आहे. असे अनेक संकेत असून, त्याची माहीती नवीन सदस्यांना नाही, तर काही जुने नगरसेवकांना याचा विसर पडला असावा, त्यामुळे सभागृहाच्या कामकाजाविषयी नगरसेवकांचे एक प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावा, अशी मागणी जगताप यांनी केली.
याची दखल घेत सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, सभागृहात नवाेदित नगरसेवकांची संख्या अधिक आहे. पहिल्या सभेला काही गाेष्टी घडल्या असतील, यापुढील सर्वसाधारण सभेत संकेत पाळले जातील. याविषयी सर्वच नगरसेवकांना याेग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल.
हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्याची नावे जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?
आयुक्त तुम्हाला हात जाेडून विनंती!
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी विषय समितींच्या सदस्यांची निवड झाली. तत्पुर्वी आयत्या वेळचे विषय म्हणून अर्चना पाटील यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, ग्रॅच्युएटीचा विषय मांडला. तसेच वर्षा तापकीर यांनी महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थींनीच्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. तसेच कर्मचाऱ्यांची पदाेन्नती आणि भरतीचा विषय यावेळी मांडला गेला. याविषयावर महापाैर मंजुषा नागपुरे यांनी आयुक्त नवल किशाेर राम यांना निवेदन करण्यास सांगितले. तेव्हा आयुक्त हे खुर्चीवर बसुनच निवेदन करू लागले. ही बाब लक्षात आल्यानंतर काॅंग्रेसचे माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी हात जाेडून आयुक्त नवल किशाेर राम यांना तुम्ही उभे राहून निवेदन करावे, अशी विनंती केली. महापाैरांसमाेर निवेदन करताना प्रशासनाने उभे राहूनच केले पाहीजे असे संकेत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आयुक्तांनी देखील मला ही बाब माहीती नाही असे नमूद करीत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी उभे राहून निवेदन केले.






