
Side Effects Of Tea: 'या' व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
Side Effects Of Tea: भारतीय घरांमध्ये बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात गरम चहाच्या कपाने करतात. पण तुम्हाला माहित्ये आहे का की काही लोकांसाठी चहा पिणे हानिकारक असू शकते? गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट शुभम वत्स यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्या लोकांनी चहा पिणे टाळावे आणि अतिसेवनामुळे आरोग्याला कोणते धोके निर्माण होऊ शकतात.(फोटो सौजन्य – istock)
चहामधील टॅनिनमुळे चहाला गडद रंग आणि तीव्र चव येते. जरी ते त्वरित ऊर्जा देत असले तरी, काही वेळाने त्यामुळे सुस्तीची भावना देखील येऊ शकते. चहामधील टॅनिन हे अँटीऑक्सिडंट असले तरी, त्यांच्या अतिसेवनामुळे पोटाच्या संरक्षक आवरणाला (गॅस्ट्रिक बॅरियर) त्रास होऊ शकतो, ज्यामुळे आम्लपित्त किंवा छातीत जळजळ होऊ शकते. चहामध्ये दूध आणि साखर घातल्याने कॅलरी आणि साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.
काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये चहाचे सेवन टाळावे. गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) ने ग्रस्त असलेल्या लोकांनी, विशेषतः गंभीर प्रकरणांमध्ये, चहा पिणे टाळावे. गर्भवती महिलांनी देखील चहाचे सेवन मर्यादित ठेवावे, कारण त्यातील कॅफीन प्लासेंटाद्वारे (वार) बाळापर्यंत पोहोचू शकते. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल, तर चहाचे सेवन कमी करण्याचा किंवा पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त, ज्यांना चिंता किंवा पॅनिक अटॅकचा त्रास आहे, त्यांनी जास्त कॅफीन असलेला चहा पिणे टाळावे.
तुम्हाला कोणताही वैद्यकीय त्रास नसला तरी, दिवसातून दोन कपांपेक्षा जास्त चहा पिणे टाळा. रात्री शांत झोप लागण्यासाठी, संध्याकाळी ५ वाजल्यानंतर चहा पिणे टाळा. चहामध्ये रिफाइन्ड साखर वापरणे टाळा. रिकाम्या पोटी चहा पिणे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणून, सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्या, हलका नाश्ता करा आणि त्यानंतर चाळीस मिनिटांनी चहा प्या. जड जेवणासोबत कधीही चहा पिऊ नका, कारण यामुळे शरीरातील लोह, जस्त आणि प्रथिने शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. जेवणाच्या ४५ मिनिटे आधी आणि नंतर चहा पिणे टाळा.