स्तनाचा कर्करोग तपासणी जागरूकता
ऑक्टोबर हा महिना पिंक अवेरनेस महिना (स्तन कर्करोग जागरूकता महिना) म्हणून पाळला जातो. बऱ्याच महिला स्वतःहून कर्करोगाची तपासणी करत नाहीत. त्यामुळे कर्करोगाचे अंतिम टप्प्यातच निदान होते. मात्र तेव्हा उपचार करणेही अशक्य होते.
अशातून कर्करुग्णांची संख्या व मृत्यू दर वाढत आहेत. कॅन्सरतज्ज्ञांच्या मते, घरच्या-घरी अत्यंत सोप्या पद्धतीने काही मिनिटातच स्वयं स्तन तपासणी करता येऊ शकते. यामुळे स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – iStock)
कधी करावी चाचणी
स्तनांची चाचणी नक्की कधी करावी
जर एखाद्या स्त्रीचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तिला स्तनात गाठ जाणवत असेल अथवा स्तनाग्रात बदल जाणवला असेल किंवा स्त्राव होत असेल, तर अशा परिस्थितीत त्वरित कॅन्सरची चाचणी करावी. एक्स-रे मॅमोग्राफी, सीटी आणि पीईटी स्कॅन यासारख्या चाचण्यांद्वारे स्तनामधील दोष शोधले जाऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशभरात साडेबारा लाख नवे कर्करुग्ण आढळून आले आहेत. आठ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे तर ५ लाख रुग्ण उपचार घेत आहेत. यात महाराष्ट्रात कर्करोगाचे प्रमाण लक्षवेधी आहे.
हेदेखील वाचा – Breast Cancer होऊ शकतो पूर्ण बरा, या पद्धतीने करा स्वतःची तपासणी
ग्रामीण भागातही वाढ
पूर्वी कर्करोग म्हटला की ही शहरी समस्या वाटत होती पण आता ती ग्रामीण भागातही याचे प्रमाण वाढत चालले आहे. २० ते २२ वयोगटातील तरुण स्त्रिया देखील या आजाराने ग्रस्त झाल्याचे पहायला मिळते. निरोगी वजन राखून, नियमित व्यायाम करून आणि अल्कोहोल आणि तंबाखूचे सेवन टाळून स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो.
काय सांगतात तज्ज्ञ
शहरातच नाही तर वाढतोय गावातही स्तनाच्या कर्करोगाचा धोका, कशी घ्याल काळजी
डॉ. मृणाल परब, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांनी सांगितले की, स्तनाग्रातून असामान्य स्राव किंवा रक्तस्राव आणि स्तनामध्ये अचानक बदल झाला असेल, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. महिलांनी घरच्या घरी स्वयं स्तन तपासणी करावी तसेच वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ज्या महिलांची प्रसूती झाली असेल त्यांनी आपल्या लहान मुलांना स्तनपान जरूर केले पाहिजे. यामुळेही स्तनाच्या कर्करोगापासून दूर राहता येऊ शकते. स्तनांच्या तपासणीसाठी फक्त तीन ते पाच मिनिटं वेळ लागतो. मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांनी, पाचव्या किंवा सहाव्या दिवशी अंघोळीच्या वेळी शॉवर जेल लावून स्वतःचे स्तन तपासणे गरजेचे आहे. तर मासिक पाळी बंद झालेल्यांनी महिन्यातून एकदा स्वतः च स्वतःची स्तन तपासणी करणं आवश्यक आहे.