
तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ
महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागरूकता वाढत असली, तपासणीसाठी पुढे येणाऱ्या महिलांची संख्या वाढत असली, तरी आजाराचा धोका कमी होत नसल्याचे चित्र उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. मुंबईतील कामा आणि ऑल्ब्लेस रुग्णालयात २०२३ मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे (स्तन कर्करोग) ८२८ रुग्ण नोंदवले गेले होते. ही संख्या २०२५ मध्ये तब्बल १,३९३ वर पोहोचली. म्हणजेच अवघ्या तीन वर्षांत, रुग्णसंख्येत सुमारे ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२६च्या पहिल्या सात महिन्यांतच रुग्णालयात ७१३ प्रकरणे नोंदली गेली आहेत.(फोटो सौजन्य – istock)
Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास
तपासणीमुळे अधिक रुग्ण निदर्शनास येत असले, तरी केवळ ‘तपासणी करा’ इतक्यापुरती जागरूकता मर्यादित न ठेवता ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढविणाऱ्या घटकांबाबत आणि तो कमी करण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायांबाबतही महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज स्पष्ट झाली आहे. तपासणीचे प्रमाण वाढल्यामुळे पूर्वी निदान न झालेली प्रकरणेही समोर येत असण्याची शक्यता डॉक्टर व्यक्त करतात. मात्र, केवळ ‘३५ वर्षांनंतर दरवर्षी तपासणी करा’ एवढी जागरूकता पुरेशी नसून प्रतिबंधात्मक उपायांबाबतही महिलांना माहिती असणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्तन कर्करोगाची केवळ तपासणी करून थांबणे पुरेसे नाही. वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित शारीरिक हालचाल करणे, योग्य आहार घेणे, स्तनपानाला प्रोत्साहन देणे आणि वैयक्तिक जोखमीची माहिती घेणेही महत्त्वाचे आहे, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात.
यावर बोलताना कामा आणि ऑल्ब्लेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, ‘स्क्रीनिंगमुळे निश्चितच अधिक महिलांचे निदान होत आहे. मात्र, केवळ तपासणी करून थांबणे पुरेसे नाही.वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित शारीरिक हालचाल करणे, योग्य आहार घेणे, स्तनपानाला प्रोत्साहन देणे आणि वैयक्तिक जोखमीची माहिती घेणेही महत्वाचे आहे.’अनेक महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे जोखमीचे घटक आणि कोणते बदल करता येऊ शकतात, याची अद्याप पुरेशी माहिती नसल्याचे ते म्हणाले.दरम्यान, ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी ‘मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेसच्या विश्लेषणानुसार भारतातील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण १९९० मधील प्रति एक लाख लोकसंख्येमागे १३ वरून २०२३ मध्ये २९.४ वर पोहोचले आहे.बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, उशिरा होणारी प्रसूती आणि इतर जोखमीचे घटक यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य जागरूकतेची गरज अधिक स्पष्ट होत आहे.