फोटो सौजन्य - Social Media
गाण्याचा लेखक कोण?
‘जिंगल बेल्स’ हे गाणे अमेरिकन संगीतकार जेम्स लॉर्ड पियरपाँट यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले. विशेष म्हणजे जेम्स हे प्रसिद्ध उद्योगपती आणि फायनान्सर जे. पी. मॉर्गन यांचे मामा होते. पियरपाँट कुटुंब बँकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असले तरी जेम्स यांनी संगीताच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
ख्रिसमससाठी नव्हे, तर वेगळ्याच कारणासाठी
लहानपणापासून हे गाणे आपण ख्रिसमसशी जोडत आलो असलो, तरी प्रत्यक्षात हे गाणे थँक्सगिव्हिंग या सणाच्या निमित्ताने एका चर्चमधील कार्यक्रमासाठी सादर करण्यात आले होते. या गाण्याच्या शब्दांमध्ये कुठेही ‘ख्रिसमस’ किंवा कोणत्याही धार्मिक सणाचा उल्लेख नाही, हे लक्षात घेतले तर ही बाब अधिक स्पष्ट होते. संशोधकांच्या मते, 1857 मध्ये प्रकाशित झाल्यानंतर अनेक वर्षांनी हे गाणे हळूहळू ख्रिसमस साजरीकरणाचा अविभाज्य भाग बनले.
अंतरिक्षात वाजलेले पहिले गाणे
‘जिंगल बेल्स’च्या नावावर एक अनोखा विक्रमही नोंदवला गेला आहे. हे गाणे अंतरिक्षातून वाजवले गेलेले जगातील पहिले गाणे ठरले. ‘जेमिनी 6’ या मोहिमेतील अंतराळवीरांनी कंट्रोल रूमशी संवाद साधताना अचानक हार्मोनिका आणि छोट्या घंट्यांच्या मदतीने ‘जिंगल बेल्स’ची धून वाजवली होती. आजही त्या घंट्या आणि हार्मोनिका स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियममध्ये जतन करून ठेवल्या आहेत.
नावामागील रंजक कथा
आज सर्वत्र ओळखले जाणारे ‘जिंगल बेल्स’ हे नाव सुरुवातीपासून नव्हते. 1857 साली जेव्हा हे गाणे प्रथम प्रकाशित झाले, तेव्हा त्याचे नाव “वन हॉर्स ओपन स्ले” असे होते. दोन वर्षांनंतर म्हणजेच 1859 मध्ये गाणे पुन्हा प्रसिद्ध झाले आणि त्यावेळी त्याला ‘जिंगल बेल्स’ हे नाव देण्यात आले. आज हे गाणे ख्रिसमसचा आत्मा बनले असले, तरी त्याची मूळ कहाणी जाणून घेतल्यावर त्यामागील इतिहास अधिकच रंजक वाटतो.






