फोटो सौजन्य - Social Media
आजचा काळ डिजिटल युग म्हणून ओळखला जातो. आज मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. मोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांच्या हातातही मोबाईल दिसतो. कारण कधी ऑनलाईन शिक्षणासाठी, तर कधी गेमिंग आणि मनोरंजनासाठी ते मोबाईलचा वापर करतात. पण याच ठिकाणी पालकांसमोर सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं आहे, कारण त्यांची नेहमीच चिंता असते की मुलं ऑनलाईन काय पाहत आहेत, काय शिकत आहेत. इंटरनेटवर ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाशी संबंधित अनेक गोष्टी सहज उपलब्ध असतात, पण त्याचसोबत त्याचे नकारात्मक परिणामही मोठ्या प्रमाणात दिसतात.
इंटरनेटचा चुकीचा वापर झाला, तर त्याचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर, स्वभावावर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांना डिजिटल जगतात सुरक्षित ठेवणं हे पालकांसाठी अत्यंत गरजेचं आहे. यासाठी काही उपाय योजले, तर पालक आपल्या मुलांच्या ऑनलाइन जगातील हालचालींवर नियंत्रण ठेवू शकतात.
सर्वप्रथम पालकांनी मुलांशी संवाद साधायला हवा. ते इंटरनेटचा वापर का करतात, त्यातून काय शिकतात, कोणते ॲप्स किंवा वेबसाईट्स वापरतात हे विचारलं पाहिजे. जेव्हा मुलांना वाटतं की पालक त्यांची गोष्ट समजून घेत आहेत, तेव्हा ते स्वतःहून आपल्या अडचणी सांगू लागतात. यामुळे मुलं आणि पालक यांच्यात विश्वास निर्माण होतो आणि मुलं काहीही लपवत नाहीत. दुसरं म्हणजे आजच्या स्मार्टफोन, टॅबलेट आणि संगणकात पॅरेंटल कंट्रोल फीचर्स असतात, तसेच वेगवेगळे ॲप्स उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित करता येतो आणि अवांछित वेबसाईट्स ब्लॉक करता येतात. पालकांनी मुलांना ऑनलाईन सेफ्टीबद्दलही शिकवायला हवं. आपलं नाव, पत्ता, शाळेचं नाव, फोन नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती इंटरनेटवर कुणाशीही शेअर करू नये, तसेच अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नये, कारण यामुळे फसवणूक होऊ शकते.
याशिवाय मोबाईल वापरण्याचा ठरावीक वेळ मुलांसाठी निश्चित करणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक मुलं अभ्यासाच्या वेळेला, जेवताना किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर व अभ्यासावर परिणाम होतो. त्यामुळे मोबाईलचा वेळ निश्चित करावा आणि अभ्यासाशी संबंधित काम असेल तर पालकांनी मुलांसोबत बसून मदत करावी. शेवटी, पालकांनी स्वतःला रोल मॉडेल म्हणून घडवणं आवश्यक आहे. कारण मुलं मोठ्यांकडून शिकतात. पालक स्वतः सतत मोबाईल वापरत राहिले, तर मुलंही त्याचं अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनीही सोशल मीडियाचा वापर आणि स्क्रीन टाईम मर्यादित करून मुलांसाठी चांगला आदर्श निर्माण करावा. अशा प्रकारे मुलांसाठी डिजिटल जग सुरक्षित बनवणं ही पालकांची जबाबदारी आहे.