राधा-कृष्णाचं प्रेम का आहे आदर्श (फोटो सौजन्य - Pinterest)
7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा उत्सव चालू होतोय. आता तुम्ही बुचकळ्यात पडू नका. प्रेमाचा उत्सव अर्थात ‘Valentines Day’. गेल्या काही वर्षात या कालावधीत प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी एका उत्सवापेक्षाही भारी स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येते. मात्र आजही भारतात प्रेम या शब्दाला समानार्थी नाव द्यायचं झालं तर सर्वात पहिले जी जोडी डोळ्यासमोर येते ती म्हणजे राधा – कृष्ण.
राधा आणि कृष्ण यांचं एकमेकांशी लग्न झालं नाही मात्र त्यांचं प्रेम आजही अमर मानलं जातं. प्रेम असावं तर राधा – कृष्णासारखं असंच म्हटलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? हे दोघं पहिल्यांदी कसे भेटले आणि त्यांच्यातील प्रेम कसं फुललं? राधा आणि कृष्णाची प्रेमकहाणी आपण व्हॅलेंटाईनच्या विकनिमित्त समजून घेऊया. याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात, त्यापैकीच एक आपण आज या लेखातून जाणून घेऊया
कशी झाली राधा-कृष्णाची पहिली भेट
पौराणिक कथेनुसार, राधा श्रीकृष्णापेक्षा सुमारे पाच वर्षांनी मोठी होती. एका कथेनुसार, जेव्हा यशोदेने कृष्णाला बांधून ठेवले होते तेव्हा राधेने पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णाला पाहिले. असे म्हटले जाते की कृष्णाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर राधा बेशुद्ध पडली होती. राधा कृष्णाला पाहताच त्याच्या प्रेमात पडली. राधाला असे वाटले की जणू तिचे कृष्णाशी मागील जन्मापासूनचे काही नाते आहे.
काही विद्वानांच्या मते, राधेने तिच्या वडिलांसोबत गोकुळात आल्यावर पहिल्यांदा श्रीकृष्णाला पाहिले. ज्या ठिकाणी ते दोघे पहिल्यांदा भेटले ते ठिकाण संकेत तीर्थ म्हणून ओळखले जाते. येथे कृष्णाला पाहून राधेचे भान हरपले. कृष्णाचीही तीच अवस्था होती. राधाला पाहून तोही वेडा झाला. दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले असे पौराणिक कथांमध्ये सांगितले जाते.
Rose Day 2025: रोज डेच्या दिवशी कोणता गुलाब कोणाला द्यावा? आधीच जाणून घ्या, नाहीतर गैरसमज होतील
श्रीकृष्णाचा जीव
असे म्हटले जाते की श्रीकृष्णाला दोन गोष्टी सर्वात जास्त आवडत होत्या, एक बासरी आणि दुसरी राधा राणी. राधा जिथे होती तिथे कृष्णाच्या बासरीचा आवाज ऐकून ती तिच्या नकळत त्याच्याकडे आकर्षित होत असे. जेव्हा कृष्ण राधेला सोडून मथुरेला जात होता, तेव्हा त्याने त्याची सर्वात प्रिय बासरी राधाला भेट दिली. राधानेही ही बासरी अनेक वर्षे सुरक्षितपणे जपून ठेवली. जेव्हा जेव्हा तिला भगवान श्रीकृष्णाची आठवण यायची तेव्हा ती ही बासरी वाजवायची असे सांगण्यात येते.
राधेच्या आठवणीत श्रीकृष्ण
भगवान श्रीकृष्णही राधेच्या स्मरणार्थ मोरपंख आणि वैजयंतीची माळ घालत असत. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाला मोरपंख मिळाला जेव्हा ते एकदा राधासोबत बागेत नाचत होते. त्याने हे मोरपंख उचलले आणि डोक्यावर घातले आणि राधेने नाचण्यापूर्वी श्रीकृष्णाच्या गळ्यात वैजयंतीची माळ घातली. या कथांवरून असे दिसून येते की राधा भगवान कृष्णाशिवाय अपूर्ण होती आणि कृष्ण राधाशिवाय अपूर्ण मानले जातात.
आदर्श जोडी
राधा आणि श्रीकृष्ण हे एकमेकांशिवाय अपूर्ण मानले जातात आणि म्हणूनच प्रेमाची परिभाषा म्हणून या जोडीला आदर्श मानले जाते. श्रीकृष्णाच्या सोळा सहस्र पत्नी होत्या असे कथांमधून सांगण्यात येते मात्र प्रेमाबाबत जेव्हा जेव्हा गोष्टी केल्या जातात त्याच्यासह राधेचे नाव जोडले जाते. त्याग, काळजी, प्रेम या सर्वाचे समीकरण म्हणून ही जोडी पाहिली जाते. आजकाल प्रेमाची व्याख्याच नवीन पिढीला माहीत नाही असं चित्र असताना आजच्या जगात राधा आणि श्रीकृष्णाच्या निर्मळ प्रेमाची नक्कीच गरज भासते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
प्रेम म्हणजे काय?
प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही तर एकमेकांना समजून घेणं, एकाला लागलं तर दुसऱ्याला न सांगता जाणवणं, एकमेकांशी भांडल्यानंतर अथवा दुखावल्यानंतरही स्वतःचा अहंकार सोडून दुसऱ्याला समजून घेणं, त्याची समजून काढणं. समोरची व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे याची जाणीव त्यांना नेहमी करून देणं, प्रेम म्हणजे त्याग. विश्वासासह एकमेकाना साथ देणे, आपल्या जोडीदाराची फसवणूक न करता त्याच्याशी कायम प्रामाणिक राहणे.
सध्याच्या पिढीसाठी सोपं करून सांगायचे झाले तर सकाळी डोळे उघडल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ज्यांचा चेहरा येतो आणि पहिला विचार ज्यांचा मनात येतो ते प्रेम. समजून उमजून प्रॅक्टिकल न राहता जगासमोर त्या व्यक्तीसमोर आपण आपल्याला विसरून जाणं म्हणजे प्रेम. त्याने आणि तिने एकमेकांना न सांगता समजून घेणं, धावत्या घाईगडबडीतही एकमेकांना साथ देणं, तिला – त्याला काय हवंय हे समजून न सांगता गोष्टी करणं, थकल्यानंतर अगदी सहज एकमेकांना जवळ घेणं हेदेखील प्रेमच आहे, तिने वा त्याने न विचारता दिसण्याचीही स्तुती करणं नात्यातील बंध जवळ आणते. एकमेकांच्या लहानसहान अपेक्षा पूर्ण करणं म्हणजे प्रेम. सहवासापेक्षा अधिक प्रेमात मौल्यवान अशी कोणतीच गोष्ट नाही. आपला वेळ फक्त तिच्यासाठी वा त्याच्यासाठी संपूर्ण देणं म्हणजे प्रेम. तिच्या वा त्याच्याबरोबर असताना केवळ एकमेकांचे असणं प्रेम.
हल्ली हे प्रेम फारच कमी दिसत असल्यामुळेच घटस्फोट आणि ब्रेपअपचे प्रमाण वाढतंय. त्यापेक्षा एकमेकांना समजून घेत राधा-कृष्ण होण्यात अधिक आनंद आहे. यावर्षी व्हॅलेंटाईनच्या दिवशी निदान एक संकल्प करा, आपल्या जोडीदाराला योग्य वेळ देण्याचा आणि त्यांचे मन जपण्याचा. राधा-कृष्णाच्या प्रेमापर्यंत नाही किमान जोडीदाराच्या प्रेमाचा आदर करण्यापर्यंत पोहचलात तरीही प्रेम जिंकलात असं समजा!