फोटो सौजन्य - Social Media
अनेकदा आपण विचार करतो, “अरे थोडं वजन वाढलंय, काही हरकत नाही.” पण खरं सांगायचं तर ही निष्काळजी वृत्ती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. शरीरावर साचलेली ही “थोडीशी चरबी” केवळ बाह्य स्वरूपावर परिणाम करत नाही, तर आतून अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देते. वाढलेलं वजन हे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांचं प्रमुख कारण मानलं जातं, मात्र त्याचसोबत ते कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचं मूळ देखील ठरू शकतं. कारण शरीरात जास्त चरबी साचली की दोन घातक प्रक्रिया सुरू होतात — हार्मोन्सचं असंतुलन आणि क्रॉनिक इन्फ्लेमेशन. चरबीच्या पेशी म्हणजे फॅट सेल्स शरीरात एस्ट्रोजेन आणि इन्सुलिन सारखे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार करतात. या हार्मोन्सचा अतिरेक शरीरातील कर्करोगी पेशींना वाढण्यासाठी पोषण देतो.
त्यामुळे वजन जितकं वाढतं, तितकं ट्यूमर पेशी वाढण्याचं प्रमाणही जास्त होतं. त्याशिवाय, चरबी वाढल्याने शरीरात सूक्ष्म स्वरूपाची सूज कायम राहते, जी दीर्घकाळ टिकल्यास “क्रॉनिक इन्फ्लेमेशन” मध्ये बदलते. ही स्थिती आपल्या सामान्य पेशींचं नुकसान करते आणि कर्करोगी पेशींसाठी वाढीस पोषक वातावरण तयार करते. वजन वाढणं ही एक सायलेंट प्रोसेस असते; बाहेरून काही दिसत नाही, पण आतून शरीरात मोठे बदल घडत असतात.
चरबी साचल्याने पेशींच्या रचनेत हळूहळू बदल होतात आणि त्या असामान्य वर्तन करू लागतात, जे पुढे आजाराचं रूप घेतात. त्यामुळे ‘थोडं वजन वाढलंय, काही होत नाही’ असा विचार करणे चुकीचं आहे. यावर उपाय म्हणून संतुलित आहार घ्यावा, तळलेले आणि प्रोसेस्ड पदार्थ टाळावेत, दररोज किमान अर्धा तास चालणे, योग किंवा हलका व्यायाम करावा. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळोवेळी आपला BMI तपासावा आणि तणाव कमी करावा, कारण स्ट्रेसमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.
शेवटी, मोटापा म्हणजे केवळ सौंदर्याशी संबंधित समस्या नसून, तो शरीराच्या आत सुरू असलेल्या गंभीर बदलांचा इशारा आहे. योग्य वेळी नियंत्रण घेतलं, तर आपण मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या घातक आजारांपासून स्वतःचं रक्षण करू शकतो.