(फोटो सौजन्य: istock)
२०१० ते २०२२ दरम्यान शारीरिक अनॲक्टिव्हीटी सुमारे ५ टक्क्यांनी वाढली आहे आणि जर ही गती अशीच राहिली तर २०३० पर्यंत ही संख्या ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते ही चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रौढांनी आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम किंवा ७५ मिनिटे जोरदार शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. अतिरिक्त वजन शरीराच्या वेगवेगळ्या अंगांवर परिणाम करते, यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, टाइप २ मधुमेह, स्मृतिभ्रंश आणि स्तन आणि कोलन कर्करोग यासारख्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.
ही अवस्था भारतातही लक्षणीयरित्या वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये देशात लठ्ठपणा वेगाने वाढत असून त्यावर हवी तितकी गंभीर चर्चा अद्याप करण्यात आली नाही. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, भारतातील जवळजवळ चार प्रौढांपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठ आहे. म्हणूनच वजन वाढणे आणि संबंधित आजार भारतासाठी एक सायलंट किलर बनत चालला आहे. काही ठिकाणी लठ्ठपणाचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत कमी आहे, तर काही ठिकाणी ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. शहरे तसेच खेड्यांमध्ये पुरुष आणि महिला दोघेही या स्थितीने ग्रस्त आहेत. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासानुसार, देशातील लाखो लोक पोटातील लठ्ठपणा, सामान्य लठ्ठपणा आणि हाय कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. गेल्या १५ वर्षांत भारतात जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ लोकांची संख्या दुप्पट झाली आहे आणि गेल्या ३० वर्षांत ती तिप्पट झाली आहे. सर्वात चिंताजनक म्हणजे, भारतात १.४४ कोटींहून अधिक मुले लठ्ठ आहेत, ज्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या अधिक वाढणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.
डॉक्टरांच्या मते, लठ्ठपणा ही केवळ वजन वाढण्याची समस्या नाही. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्लीप एपनिया आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होणे हे सर्वात धोकादायक मानले जाते. आपली बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी ही या वाढत्या समस्येमागील प्रमुख कारणे आहेत. शहरीकरण, जास्त वेळ बसून काम करणे, कमी शारीरिक हालचाली आणि प्रक्रिया केलेल्या आणि फास्ट फूडचे अधिक सेवन यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. WHO च्या मते, भारतातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या पुरेसा व्यायाम करत नाही. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, लोकांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे आणि स्क्रीन टाइम वाढला आहे.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करावं?
तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल आणि तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या आहारात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणा. तळलेले फास्ट फूड, प्रोसेस फूड आणि जास्त साखरेचे पदार्थ खाणे टाळा. आहारात प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करा जसे की, डाळी, कडधान्ये, सोयाबीन, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, ओट्स, क्विनोआ, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या.
वजन कमी करण्यासाठी फक्त आहारच नाही तर शारीरिक हालचाल देखील महत्त्वाची आहे. जलद चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा योगासनांचा आपल्या रोजच्या जीवनात समावेश करा.
सकाळी कोमट पाण्यासोबत लिंबाचा रस पिलियासचयापचय वाढवण्यास आणि चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






