लहान मुलांना कडदोरा कड, कडा किंवा करदोरी बांधण्याची प्रथा अनेक गावांमध्ये आणि समाजांमध्ये आढळते. भारतीय परंपरेत लहान मुलांचे संरक्षण, त्यांचे आरोग्य आणि त्यांच्या भोवती सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक प्रथा पाळल्या जातात. त्यापैकी एक महत्त्वाची प्रथा म्हणजे कडदोरा बांधणे. हा साधा धागा दिसला तरी त्यामागे संस्कृती, श्रद्धा आणि काही प्रमाणात आरोग्यविषयक कारणे जोडलेली असतात.
भारतीय संस्कृतीतील कुळाचार किंवा धर्मशास्त्र हे ऋतुचक्र आणि आयुर्वेदावर आधारलेलं आहे. धार्मिकृष्ट्या असं म्हटलं जातं की, लहान बाळाच्या कमरेला कडदोरा बांधला की, मुलांना नजर लागत नाही. वाईट शक्तींपासून त्यांचं रक्षण होतं, असा एक समज आहे. लहान मुले नाजूक असतात आणि त्यांच्यावर वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव होऊ शकतो, असा लोकांचा समज आहे. त्यामुळे कडदोरा हा नजरबट्टू म्हणून बांधला जातो. काळा, लाल किंवा पिवळा धागा मुलाच्या पायात किंवा हातात बांधल्याने त्यावर नजर वळते आणि मुलावरची नकारात्मकता दूर राहते, असे मानले जाते. ही प्रथा गावांमध्ये, शहरांमध्ये आणि विविध समाजांत आजही टिकून आहे. असं असलं तरी कडदोरा बांधण्याचं खरं कारण तुम्हाला माहितेय का ?
कमरेला कडदोरा बांधणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे असं आपलं आयुर्वेद सांगतं. कडदोरा बांधल्याने पोटाला हलकंसं प्रेशर येतं. म्हणजेच कडदाेरा कंबरेच्या आजूबाजूला अॅक्युप्रेशर निर्माण करतं ज्यामुळे पोटाच्या तक्रारी होत नाही. तसंत रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुरळीत होते, असं आयुर्वेद म्हणतं. हा कडदोरा बाळाच्या कंबरेला, हाताला किंवा पायाला बांधला जातो.
खरंतर कडदोरा बांधण्याची योग्य पद्धत देखील आहे. सर्वात आधी एका स्वच्छ जागी अंघोळ करुन काही विधी पार पाडाव्या लागतात. या काळ्या धाग्याला तीन गाठी माराव्यात. या तीन गाठींना देखील काही अर्थ आहे.
पहिली गाठ
पहिली गाठ ही शरीराच्या रक्षणासाठी बांधली जाते.
दुसरी गाठ
दुसरी गाठ ही मनाच्या स्थैर्यासाठी बांधली जाते.
तिसरी गाठ
तिसरी आणि सर्वात महत्वाची गाठ ही अध्यात्मिक ऊर्जेसाठी बांधली जाते.
कडदोऱ्याबाबत अशी देखील एक कथा सांगितली जाते की, पुर्वीच्या काळी लोक काही वेळेस लांबच्या प्रवासाला पायी चालत जायचे. त्यामुळे अनेक रानवाटेने जाताना साप किंवा विंचू पायाला दंश करायचे. हे विष शरीरात पसरु नये म्हणून कंमरेचा कडदोर काढून जखम झालेला ठिकाणी बांधला जायचा. जेणकरुन विष शरीरात पसरु नये.
कडदोरा बांधताना अनेक काही ठिकाणी त्यात हळद, कापूर, निलगिरी तेल किंवा इतर सुगंधी नैसर्गिक पदार्थ वापरले जातात. यामुळे मुलांच्या त्वचेला हलके संरक्षण मिळते, तसेच कीटक दूर राहतात. यात वैज्ञानिक सत्य आहे की हळद, निलगिरी आणि कापूरामध्ये प्रतिजैविक (antibacterial) व कीटकनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे मुलांची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
पूर्वी ग्रामीण भागात लहान मुले शेतात, अंगणात किंवा वाड्यांवर खेळत असत. प्रत्येक कुटुंब विशिष्ट रंगाचा किंवा पद्धतीचा कडदोरा बांधत असे, ज्यामुळे मुलांची ओळख सहज व्हायची आणि ते हरवण्याचा धोका कमी होत असे. त्यामुळे कडदोरा हा फक्त आध्यात्मिक नाही तर व्यवहारिक उपयोगाचाही भाग होता.






