शिक्षण महर्षी, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची आज १००वी पुण्यतीथी. समाजात एकरुपता यावी. सर्वांना शिक्षणाचा, जगण्याचा समान अधिकार मिळावा यासाठी झटणारा राजा म्हणून शाहू महाराजांची किर्ती आहे. केवळं राजेपण न मिरवता सामाजातील प्रत्येक घटकासाठी आपला उपयोग व्हावा यासाठी शाहू महाराज अखंड आयुष्य झटत राहिले. सक्तीचं शिक्षण, स्त्री सक्षमीकरण, समानता, दिनदुबळ्यांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देणे, जातीव्यवस्थेतील विषमता दूर करणे अशी अनेक महान कामं महाराजांनी त्यांच्या कालखंडात पार पाडली.
१९०१ ते १९२२ या बावीस वर्षांच्या कालखंडात शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानात भिन्नभिन्न जातींची २३ वसतिगृहे स्थापन करून त्या त्या जातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोलाची मदत केली.
‘शिक्षणच आमचा तरणोपाय आहे, असं माझं ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असं इतिहास सांगतो.’ हा शाहू छत्रपतींनी शिक्षणाबद्दल मांडलेला विचार त्यांच्या शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकतो.
त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याची घोषणा करून तसे प्रयत्न केले होते. ३० सप्टेंबर १९१७ला कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.
हरित क्रांतीची बीजे प्रथम शाहू छत्रपतींनी आपल्या कोल्हापूर संस्थानामधे १९०८-०९लाच रोवली होती. कोल्हापूर संस्थानामधे दर तीन वर्षांनी पडणार्या दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊनच, शाहू छत्रपतींना राधानगरी धरणाची संकल्पना सुचली असावी, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
शेतीसंबंधी चहा-कॉफीसारखं पैशाचं पीक घेण्याचा अभिनव प्रयोग शाहू छत्रपतींनी पन्हाळा आणि भुदरगड भागात राबवलेला दिसून येतो. शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानाल्या शेतीला कायमचा पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाणी पुरवठ्याच्या लहान-मोठ्या योजना कार्यवाहीत केल्या होत्या.
शाहू छत्रपतींनी विवाह, घटस्फोट, स्त्रियांवर होणारे शारीरिक अत्याचार, अनौरस संततीला मालमत्तेत हक्क अशा प्रकरणांमधे स्त्रियांना स्वातंत्र्य देणारे आणि समानतेचे हक्क देणारे अनेक कायदे करून ते कोल्हापूर संस्थानामधे अंमलात आणले होते.
कोल्हापूर संस्थानात स्त्री शिक्षणासाठी एक खास अधिकारपद निर्माण करण्यात आलं होतं. त्या पदावर फेमिल ट्रेनिंग स्कूलमधे कार्यरत असणार्या सौ. रखमाबाई केळवकर या बुद्धिमान आणि कर्तव्यदक्ष स्त्रीची १ सप्टेंबर १८९५ला नेमणूक केली होती.
शाहू छत्रपतींनी त्यांची सून इंदूमती राणीसाहेबांना त्यांचं पुढील आयुष्य अधिक सन्मानानं आणि सुरक्षितपणे जगता यावं म्हणून वा. द. तोफखाने यांच्या देखरेखीखाली त्यांच्या शिक्षणाची सोय केली.