लठ्ठपणामुळे उद्भवू शकते महामारी (फोटो सौजन्य - iStock)
अलीकडील लॅन्सेट अभ्यासात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की २०५० पर्यंत, भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ एक तृतीयांश, सुमारे ४४९ दशलक्ष लोक, जास्त वजन किंवा लठ्ठपणाचे बळी असतील. या अभ्यासानुसार भारतातील २१.८ कोटी पुरुष आणि २३.१ कोटी महिला लठ्ठपणाने ग्रस्त असतील. जागतिक स्तरावर, २०५० पर्यंत अर्ध्याहून अधिक प्रौढ आणि एक तृतीयांश मुले आणि किशोरवयीन मुले जास्त वजन किंवा लठ्ठपणाचे बळी ठरतील अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
कोणत्या वयोगटातील लोकांना जास्त धोका
विशेषतः वृद्ध किशोरवयीन मुलांमध्ये (१५-२४ वर्षे) लठ्ठपणाचे प्रमाण चिंताजनक आहे. तरुण पुरुषांमध्ये, लठ्ठपणा १९९० मध्ये ०.४ कोटींवरून २०२१ मध्ये १.६८ कोटींवर पोहोचला आहे आणि २०५० पर्यंत तो २.२७ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तरुणींसाठी, ही संख्या १९९० मध्ये ०.३३ कोटी होती ती २०२१ मध्ये १.३ कोटी झाली आहे आणि २०५० पर्यंत ती १.६९ कोटीपर्यंत वाढू शकते. २०२१ मध्ये, भारताने या श्रेणीत पूर्ण संख्येने चीन आणि अमेरिकेला मागे टाकले.
लठ्ठपणा आणि आजारांवरील रामबाण उपाय लो कॅलरी फूड्स, 5 पदार्थांचा करा डाएटमध्ये समावेश
का ठरतोय चिंतेचा विषय
अभ्यासात सांगितल्यप्रमाणे २०२१ मध्ये, जगातील निम्मे लठ्ठ प्रौढ भारतासह फक्त आठ देशांमध्ये राहत होते. वाढत्या लठ्ठपणा, बालपणातील कुपोषण आणि संसर्गजन्य आजारांचे संयोजन भारताच्या आरोग्यसेवा व्यवस्थेवर गंभीर दबाव आणू शकते. बालपणातील कुपोषणामुळे प्रौढावस्थेत चरबी जमा होते, ज्यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि काही कर्करोगांचा धोका वाढतो. लठ्ठपणामुळे अनेक समस्या उद्भवतात आणि त्यानेच अनेक आजारही होतात.
लठ्ठपणा ठरतोय महामारी
या वाढीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे मीठ, साखर आणि चरबीयुक्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वाढता वापर. बहुराष्ट्रीय अन्न कंपन्या आणि फास्ट-फूड चेन कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये त्यांच्या बाजारपेठांचा विस्तार करत आहेत, जिथे वाढती उत्पन्न आणि कमकुवत नियमांमुळे अनुकूल वातावरण निर्माण होते. २००९ ते २०१९ दरम्यान, भारत, कॅमेरून आणि व्हिएतनाममध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न आणि पेयांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली. या संकटाचा सामना करण्यासाठी, वाढत्या लठ्ठपणाच्या साथीला रोखण्यासाठी मजबूत नियम, सार्वजनिक आरोग्य धोरणे आणि जागरूकता मोहिमा आवश्यक आहेत. वेळेवर याकडे लक्ष दिले नाही तर जगभरात लठ्ठपणा ही एक महामारी ठरू शकते आणि त्याला रोख लावणं अत्यंत कठीण होऊ शकतं.
लठ्ठपणा कमी करण्याचे 4 आयुर्वेदिक उपाय, 1 महिन्यात विरघळेल पोटाची चरबी
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.