Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
Delimitation Bill: शरद पवारांचे खासदार आज पंतप्रधान मोदींच्या भेटीला
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा आठवडा सुरू होत असून, या काळात अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर असणार आहे. संसदेत नव्याने सादर होणाऱ्या बहुचर्चित ‘डीलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत या भेटीबाबत माहिती दिली आहे.
10 Aug 2026 04:57 PM (IST)
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलिसी कारवाई आणि लाठीचार्जबाबत विरोधी पक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. गेल्या १३- १४ दिवसांपासून अमित शाह सभागृहात न आल्याने विरोधी इंडिया आघाडी सातत्याने अमित शाहांवर टिका करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांवरील हिंसक कारवाई आणि लाठीचार्जच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे नाही, म्हणून अमित शाह सभागृहात येण्याचे टाळत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. पण आता अमित शहा सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सभागृहात येणार असल्याची माहिती मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. वाचा सविस्तर...
10 Aug 2026 04:47 PM (IST)
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून आटपाडी येथे त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेपूर्वी जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. औक्षण केल्यानंतर व्यासपीठाकडे जाताना त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. यावेळी झालेल्या भाषणात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या एकजुटीचा मुद्दा उपस्थित करत आरक्षणाच्या मागणीवरून सरकारवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर समाजाच्या भूमिकेविरोधात जाणाऱ्यांवरही त्यांनी आक्रमक शब्दांत भाष्य केलं. वाचा सविस्तर...
10 Aug 2026 04:37 PM (IST)
मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘सठिया गये, बूढे हो गये, त्यांना उपचाराची गरज आहे’, अशी टीका मेहता यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. मिरा-भाईंदरमधील शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, आता हा राजकीय वाद व्यक्तिगत टीकेपर्यंत पोहोचल्याने स्थानिक राजकारणात वातावरण अधिक तापले आहे. वाचा सविस्तर...
10 Aug 2026 04:27 PM (IST)
सोलापुरच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्कलकोट विधानसभा मदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाहनचालकाला कल्ल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्याची ऑफर देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे राजकीय तसेच पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. वाचा सविस्तर...
10 Aug 2026 04:17 PM (IST)
आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यात एका १६ वर्षीय मुलीवर तिच्याच घरात बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिचा चेहरा ठेचण्यात आला, तिच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करण्यात आला आणि तिच्या गुप्तांगात सळीसारखी वस्तू घालण्यात आली. या घटनेमुळे आसामच्या बराक खोऱ्यात संताप आणि आंदोलने उसळली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या मते, प्राथमिक तपासात या हत्येमागे प्रेमत्रिकोण हे कारण असू शकते. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.या घटनेनंतर संपूर्ण बराक खोऱ्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. वाचा सविस्तर...
10 Aug 2026 04:06 PM (IST)
स्कॉटलंड च्या ग्लासको इथे झालेल्या कॉमनवेल्थ २०२६ स्पर्धेमध्ये मेडल जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवासस्थानी खास भेट घेतली. याचवेळी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सलग तिसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या मीराबाई चानू च्या सुंदर आणि अप्रतिम खेळाची तारीफ केली. खरं तर मीराबाई चानू गोल्ड मेडल जिंकल्यावर भावुक झाल्या होत्या, तसेच पोडियमवर मेडल स्वीकार करताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू सुद्धा आलेले जगाने पाहिले. पंतप्रधान मोदी यांनी मीराबाई चानू ची प्रशंसा करताना सांगितले कि, तुम्हाला तिसऱ्यांदा गोल्ड मेडल घेताना बघून माझ्या सहित सर्व देशाला तुमचा अभिमान वाटला. तेव्हाच त्यांनी मीराबाईच्या रडण्याचे कारण विचारले असता, मीराबाई ने सांगितले कि पॅरिस ऑलम्पिक मध्ये फक्त एका किलोने माझं मेडल राहिलं होतं.
10 Aug 2026 04:00 PM (IST)
नंदुरबारच्या १० हजार ४७० शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला...
१७ हजार ५४३ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ; १० हजार ४७० जणांची ई-केवायसी पूर्ण...
पावसाअभावी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीची प्रतीक्षा संपणार....
10 Aug 2026 03:57 PM (IST)
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत केलेल्या विलीनीकरणाला लोकसभेच्या अध्यक्षांनी दिलेली मान्यता रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी होत आहे.
10 Aug 2026 03:45 PM (IST)
आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरण हे भावना, धार्मिक जवळीक किंवा वैचारिक आघाड्यांवर चालत नसून ते केवळ आणि केवल कठोर राष्ट्रीय हितांवर आधारित असते. याचाच प्रत्यय नुकताच मक्का येथे पार पडलेल्या एका मोठ्या घडामोडीत आला आहे. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की या तीन महत्त्वाच्या मुस्लिम देशांनी एकत्र येत ‘मक्का संयुक्त संरक्षण करारा’वर स्वाक्षरी केली. या करारानुसार एका देशावरील लष्करी हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल, ज्याला जागतिक वर्तुळात ‘इस्लामिक नाटो’ असे संबोधले जात आहे.
10 Aug 2026 03:34 PM (IST)
मुंबई महापालिकेच्या शाळा आणि रुग्णालयांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी पालिकेने ‘पार्टीसीपेट मुंबई’ हे विशेष पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसआर आणि दानशूर व्यक्तींकडून रोख रकमेऐवजी थेट वस्तू व वैद्यकीय उपकरणांच्या स्वरूपात मदत घेऊन कामात पारदर्शकता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी दिली.
10 Aug 2026 03:25 PM (IST)
कोल्हापूरजवळ असलेल्या नागाव या गाावातील धनराम कुंभार हे गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ हाताने बनवलेल्या चाळण्यांचा व्यवसाय करत आहेत. या चाळण्यांची विक्री करण्यासाठी त्यांना एका गावातून दुसऱ्या गावात पायी फिरावे लागत होते. अशाच प्रकारे धनराम आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी खांद्यावर पेलत होते.
10 Aug 2026 03:20 PM (IST)
Jharkhand student protest: झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सोमवारी (10 ऑगस्ट 2026 ) अधिक आक्रमक झाले. विधानसभा घेरावासाठी राजधानी रांचीमध्ये जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी पोलिसांनी उभारलेले एकामागून एक बॅरिकेड्स पार केले. अखेर विद्यार्थ्यांनी आठवे बॅरिकेडही तोडून विधानसभा परिसराच्या दिशेने आगेकूच केली.
10 Aug 2026 03:14 PM (IST)
राज्य सरकारने गोरगरीब जनतेचे रेशन धान्य बंद केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे.
करवीर तालुका अध्यक्ष राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
10 Aug 2026 03:09 PM (IST)
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा घातलेला घाट सरकारने थांबवावा..
नसता केंद्रातील धर्मेंद्र गेला राज्यातील देवेंद्र जाऊ नये एवढी आमची अपेक्षा...
सरकारने निर्णय रद्द न केल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार
रिपब्लिकन सेना चे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांचा परळीतून इशारा
10 Aug 2026 02:59 PM (IST)
पुणे महानगरपालिकेच्या पाच शाळा आकांक्षा फाउंडेशनला चालवण्यासाठी दिल्यानंतर आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवण्यासाठी दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शाळा येरवडा, संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यम शाळा कोंढवा, पुण्यश्लोक आहिल्यादेवी शाळा औंध स्वर्गीय विठ्ठलराव तुपे शाळा हडपसर, पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा कोथरूड आणि आचार्य विनोबा भावे शाळा गंज पेठ सम्राट अशोक विद्या मंदिर कर्वेनगर या शाळांचा समावेश आहे.
10 Aug 2026 02:49 PM (IST)
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाच्या दुसऱ्याच दिवशी आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या गडचिरोलीतील कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, जपतलाई येथे रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. सुमारे 79 विद्यार्थिनी जमिनीवर झोपलेल्या होत्या. याचदरम्यान काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची माहिती आहे. यात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, एक अत्यवस्थ, दोघी गंभीर असून, 14 विद्यार्थिनी निरीक्षणाखाली आहे.
10 Aug 2026 02:40 PM (IST)
जळगावच्या जामनेर आगारातून चोरांनी चक्क एसटी महामंडळाची नवी कोरी बस चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री 2 वाजता चोरांनी चोरून नेलेली ही बस आज सकाळी जामनेर तालुक्यातील शहापूर गावात मिळून आली आहे. बसचे चाक पंचर झाल्याने चोरांचा बस चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला असून शहापूर गावाजवळ बस सोडून चोरटे पसार झाले आहेत. चक्क बस चोरून नेण्याच्या घटनेने खळबळ उडाली असून जामनेर आगारातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
10 Aug 2026 02:30 PM (IST)
वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केली आहे. या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला आहे. माझं कोणत्या व्यक्तीशी वाद नाही. मात्र जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल, असा समज ठेऊन कोणी नाटक करेल, तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे, हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल, असा घणाघात केला.
10 Aug 2026 02:21 PM (IST)
जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकनाथ शिंदे शिवसेनेने, अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या अकोले मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी आयोजित केलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ यांनी हजेरी लावली. यावेळी अकोले शहरातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. हे शक्ती प्रदर्शन म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये अकोले तालुक्यात, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीतील राजकीय संघर्षाची नांदी मानली जात आहे.
10 Aug 2026 02:12 PM (IST)
जालन्यात फिर्यादी अधिकारीच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली. जालन्याचे बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना परतूर पोलिसांनी अटक केली आहे. बांधकाम कामगार साहित्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार प्रकरणी परतुर पोलिसांनी कामगार अधिकाऱ्यासह सात आरोपींना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी परतूर पोलिसांत अमोल जाधव यांनीच बांधकाम कामगार साहित्यात गैरव्यवहार झाल्याची फिर्याद परतूर पोलिसात दिली होती. त्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत अमोल जाधव यांना अटक केली.
10 Aug 2026 02:02 PM (IST)
जालन्यात फिर्यादी अधिकारीच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली. जालन्याचे बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना परतूर पोलिसांनी अटक केली आहे. बांधकाम कामगार साहित्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार प्रकरणी परतुर पोलिसांनी कामगार अधिकाऱ्यासह सात आरोपींना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी परतूर पोलिसांत अमोल जाधव यांनीच बांधकाम कामगार साहित्यात गैरव्यवहार झाल्याची फिर्याद परतूर पोलिसात दिली होती. त्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत अमोल जाधव यांना अटक केली.
10 Aug 2026 02:00 PM (IST)
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli Snake Bite) धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रविवारी, १० ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारास वसतिगृहातील एका खोलीत विषारी साप शिरला. या खोलीत सुमारे ७९ विद्यार्थिनी झोपल्या होत्या. त्यावेळी सापाने काही विद्यार्थिनींना दंश केल्याने वसतिगृहात एकच खळबळ उडाली.
10 Aug 2026 01:55 PM (IST)
सध्या स्मार्टफोन आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. कॉलिंग, मेसेजिंगपासून सोशल मीडिया अपडेट्सपर्यंत आपलं आयुष्य स्मार्टफोनवर अवलंबून आहे. स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर, चांगला कॅमेरा आणि मोठी बॅटरी दिली जाते. म्हणजेच एकाच डिव्हाईसमध्ये अनेक काम होतात. यामुळेच बरेच लोकं स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. स्मार्टफोन जरी महत्त्वाचे डिव्हाईस असले तरी असे अनेकजण सेकेंडरी फोन म्हणून किंवा डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी किपॅड म्हणजेच फीचर फोन वापरतात.
10 Aug 2026 01:50 PM (IST)
श्रीवर्धन शहरातील वाणी आळी बाजारपेठ परिसरातील व्यापारी, बाधित व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक स्वप्नील पाब्रेकर यांच्या निवासस्थानी पार पडली. श्रीवर्धन शहरातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विषयाला तीव्र विरोध व्यक्त करत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये या चर्चेसाठी प्रभाग क्रमांक ५, ६ आणि ७ मधील नगरसेवकांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. येत्या १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर रस्ता रुंदीकरणाचा विषय समाविष्ट करण्यात आल्याची माहिती समजताच व्यापारी व नागरिकांनी तातडीने ही बैठक बोलावली होती.
10 Aug 2026 01:45 PM (IST)
शेतातील मिरची विक्री करून रात्रीच्या वेळी गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रवास हातणी गावाजवळ जीवघेणा ठरला. पुढे जाण्यासाठी हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी मालवाहू वाहन अडवून शेतकरी व चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजेंद्र पाटीलबा बाहेकर (रा. किन्होळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
10 Aug 2026 01:40 PM (IST)
एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलिस दलातील १५० पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध पोलिस घटकांतून १२ निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली झाली आहे. तर आयुक्तालयातील दोन निरीक्षकांची अन्य घटकांत बदली झाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गतही सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
10 Aug 2026 01:35 PM (IST)
जागतिक राजकारणात एकाच वेळी दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत, ज्यांचे पडसाद संपूर्ण मध्य पूर्व आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर उमटण्याची शक्यता आहे. एका बाजूला इराणने आपल्या सर्वात शक्तिशाली सुरक्षा संस्थेत मोठे बदल करत इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) दीर्घकाळचे कमांडर मोहसेन रझाई यांची ‘सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे’ (Supreme National Security Council) सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
10 Aug 2026 01:25 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथील बनावट व भेसळयुक्त दूध निर्मितीप्रकरणी पोलिसांनी रविवारी (दिनांक ९) रोजी आणखी दहा जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या २४ झाली असून, भेसळ दूध प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. यापूर्वी या प्रकरणात २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 Aug 2026 01:15 PM (IST)
दक्षिण आशियातील भू-राजकीय घडामोडींच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि रणनीतिक बातमी समोर आली आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह (Balen Shah) यांनी चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर स्वतः लादून घेतलेला एक कडक नियम बाजूला ठेवत थेट परदेशी राजदूतांशी समोरासमोर (One-on-One) चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या नव्या राजनैतिक संवादाची सुरुवात करताना पंतप्रधान शाह यांनी चिनी किंवा अमेरिकन राजदूतांना मागे टाकत सर्वात आधी भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांची भेट घेतली आहे. काठमांडू येथील सिंह दरबारमधील पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कार्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
10 Aug 2026 01:08 PM (IST)
“आजचा दिवस केवळ नवीन इलेक्ट्रिक ट्रकच्या लॉन्चचा नाही, तर भारताच्या हरित आणि शाश्वत वाहतूक क्रांतीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. बॅटरी व इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाला हरित वाहतुकीची दिशा दाखवत आहे,” असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
10 Aug 2026 01:02 PM (IST)
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत ८ किलो ५०० ग्रॅम गांजा तसेच एक कार असा एकूण ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गांजा विक्रीसाठी आणला होता की अन्य कोणत्या उद्देशाने जवळ बाळगला होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
10 Aug 2026 12:48 PM (IST)
पुणे-नाशिक महामार्गालगत पिंपळवंडीजवळील कांदळी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तुळजाभवानी कलाकेंद्रात शनिवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. महिलांची बैठक (कला सादर करण्याची वेळ/बैठक) लावण्यावरून झालेल्या तीव्र वादातून चाकण येथील एका तरुणाने थेट गोळीबार केला. या घटनेत ओतूर येथील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलाकेंद्रात महिलांची बैठक लावण्यावरून चाकण येथील तरुण आणि इतर उपस्थितांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या चाकण येथील तरुणाने पिस्तूल काढून गोळीबार केला. यामध्ये फिरोज कादिर शेख (वय ३१, रा. ओतूर) हा तरुण गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला.
10 Aug 2026 12:36 PM (IST)
वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना विश्रांतवाडी पोलिसांनी सराईत वाहनचोराला अटक करून त्याच्याकडून तब्बल सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त दुचाकींची एकूण किंमत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये असून, या दुचाकी महागड्या तसेच स्पोर्ट बाईक असल्याचे समोर आले आहे. वाहनचोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ओमकार रामभवन यादव (वय २०, रा. शांतिनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत राऊत, सहाय्यक निरीक्षक सुनिल उगले व तपास पथकाने केली आहे.
10 Aug 2026 12:26 PM (IST)
Ranchi Student Protest LIVE News: झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्या भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज १७ वा दिवस आहे. रविवारी विद्यार्थी आणि सरकारी प्रतिनिधी मंडळ यांच्यात झालेली चर्चेची तिसरी फेरीही अनिर्णित राहिली. चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांच्या दोन प्रमुख मागण्यांवर एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज विधानसभेला घेराव घातला आहे JSSC CGL परीक्षा रद्द करणे आणि परीक्षेतील अनियमिततेची सीबीआय चौकशी या मागण्यांवर आंदोलक ठाम आहेत आणि विधानसभेच्या मोर्चासाठी हजारो विद्यार्थी रांचीतील जयपाल सिंग मुंडा स्टेडियममध्ये जमले आहेत.
10 Aug 2026 12:24 PM (IST)
बोअरची मोटर काढून नेल्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका कुटुंबाला लाकडी बांबू, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच लोखंडी हत्याराने वार करून आयफोन फोडण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे येथील उत्तम स्वीट होम दुकानासमोर घडली आहे. या प्रकरणात राजश्री कुंदन रावत (४२, म्हाळुंगे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बाळु पवार (वय २७), रमेश बाळु पवार (वय २५), अस्लम शेख आणि सम्राट शिंदे (सर्व रा. उत्तम स्वीट होम दुकान जवळ, म्हाळुंगे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 Aug 2026 12:12 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एअरो स्पेस मॉलमधील ‘द हाऊस कम्यून बार अँड ईटरी’ बारमध्ये गुन्हे शाखेने छापा कारवाई केली आहे. रविवारी पहाटेपर्यंत नियमबाह्य पद्धतीने दारू पुरवठा सुरू असल्याचे आढळून आले असून, याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईच्या वेळी बारमध्ये महिलांसह ८९ ग्राहक उपस्थित होते. याप्रकरणी सुमित गोटे (स्पॉन्सर), नूर हुसून शेख (मॅनेजर), सोनाली पंडित (डीजे), मंगेश धिमधिमे (मालक), अनिकेत किर, सुनीता वर्मा, अनंत गायकवाड आणि शानूर काजी (कामगार) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर बीएनएस कलम २२३, ३(५), दारूबंदी कायद्यातील कलम ६८, ७७, ८२, ८३, तसेच प्रो. ऑफ. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर अॅक्ट कलम ४ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३३(डब्ल्यू) सह नियम १३१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 Aug 2026 11:50 AM (IST)
रस्त्यावरचे खड्डे आणि त्यातून नागरिकांना होणारा त्रास हा काही नवीन विषय नाही. मात्र, या समस्येकडे मोठ्यांनी दुर्लक्ष केले असताना कर्जत तालुक्यातील काही शाळकरी मुलींनी थेट पत्रकाराची भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-कोंदिवडे मार्गाची दयनीय अवस्था दाखवणारा या मुलींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. खांडपे येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी हा भन्नाट प्रयोग केला. रोज शाळेत ये-जा करताना त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही समस्या फक्त बोलून न दाखवता ती लोकांसमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी चक्क वृत्तवाहिनीच्या बातमीची नक्कल करत त्यांनी स्वतःच एक छोटा रिपोर्ट तयार केला.
10 Aug 2026 11:45 AM (IST)
कल्याण पश्चिमेकडील संदीप हॉटेल परिसर आणि आजूबाजूच्या भागात एका भटक्या कुत्र्याने (Kalyan Stray Dog) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून या कुत्र्याने नागरिकांवर अचानक हल्ले करत चावा घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत जवळपास १२५ ते १५० नागरिकांना या कुत्र्याने चावा घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
10 Aug 2026 11:35 AM (IST)
मतदार याद्यांमधील दुबार नोंदी शोधून त्या कमी करण्यावर विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) प्रक्रियेत भर देण्यात आला आहे. एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास त्यापैकी सध्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणीच नाव कायम ठेवले जाणार आहे. अन्य ठिकाणच्या नोंदीवर ‘ऑलरेडी एनरोल्ड’ असा शेरा नोंदवून संबंधित नाव प्रारूप मतदारयादीत समाविष्ट केले जाणार नाही. मात्र, कोणत्याही मतदाराची नोंद वगळण्यापूर्वी त्याला सुनावणीची संधी दिली जाणार आहे.
10 Aug 2026 11:25 AM (IST)
अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या तिच्या ‘इश्कनामा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, शहनाजने शूटिंगदरम्यान घडलेल्या एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.
10 Aug 2026 11:16 AM (IST)
यवतमाळमधील राळेगाव तालुक्यातील वालधूर येथे प्रस्तावित देशी दारूविक्री दुकान आणि बिअर बारला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांच्या कथित खोट्या सह्यांचा आधार घेत दारू दुकानासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात आल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले आहे. हा ठराव रद्द करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १४ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे
10 Aug 2026 11:10 AM (IST)
स्वप्नांना कोणतीही सीमा नसते. जर जिद्द पक्की असेल, तर छोट्या गावातील किंवा कसबा गल्लीतून निघून जगातील सर्वात मोठ्या मंचावर पोहोचणे कठीण नसते. तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात राहणाऱ्या १७ वर्षीय प्रणव इलंगोने अशीच एक कमाल करून दाखवली आहे. प्रणवला अमेरिकेच्या अत्यंत प्रसिद्ध आयव्ही लीग युनिव्हर्सिटी असलेल्या ‘ब्राऊन युनिव्हर्सिटी’मध्ये प्रवेश मिळाला आहे. विशेष म्हणजे, त्याला तिथून ३.५५ कोटी रुपयांची फुल स्कॉलरशिप दिली गेली आहे.
10 Aug 2026 11:00 AM (IST)
वेस्ट इंडिजला एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र होण्याची संधी पुन्हा एकदा हुकली आहे. दोन वेळच्या विश्वविजेत्या संघाला आता २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीतून जावे लागणार आहे. ही सलग तिसरी विश्वचषक फेरी आहे, ज्यात वेस्ट इंडिज थेट पात्रतेतून बाहेर पडला आहे. आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या विजयानंतर वेस्ट इंडिजला धक्का बसला. या विजयामुळे थेट पात्रतेच्या शर्यतीत अफगाणिस्तानचे स्थान अधिक मजबूत झाले.
10 Aug 2026 10:50 AM (IST)
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) सायंटिस्ट आणि इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंजिनिअरिंग तरुणांसाठी भरतीची मोठी संधी आली आहे. इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्डाने ‘सायंटिस्ट-इंजीनियर एससी’च्या ९३ पदांवर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्ससह विविध इंजिनिअरिंग विषयांवर केली जाणार आहे. पात्र उमेदवार १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या भरतीत उमेदवारांना मुलाखतीसाठी (इंटरव्यू) GATE २०२५ किंवा GATE २०२६ च्या वैध स्कोअरच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल.
10 Aug 2026 10:40 AM (IST)
अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात कौटुंबिक आणि शेतीच्या वादातून रक्तरंजित घटना घडली आहे. बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबी मालोकार येथे एका युवकावर ३ ते ४ गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. अमोल गजानन मालोकार असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणात त्याचा चुलत भाऊ अजय मालोकार याच्यावर पोलिसांचा संशय आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
10 Aug 2026 10:30 AM (IST)
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघात आणखी एक मोठा बदल झाला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीनंतर, साई सुदर्शनलाही या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. वृत्तानुसार, सुदर्शन दुखापतीतून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. बीसीसीआयने त्याच्या जागी सरफराज खानची निवड केली आहे. तो लवकरच कोलंबो येथे भारतीय संघात सामील होईल. एकीकडे देवदत्त पडिक्कलने शतक ठोकून आपली दावेदारी मजबूत केली तर सरफराजच्या समावेशामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर गॉल कसोटीसाठी अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
10 Aug 2026 10:20 AM (IST)
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळला. हा सामना कोलंबो येथील नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारताने सहा विकेट्सने विजय मिळवला. तिसऱ्या दिवशी, चौथ्या डावात भारतासमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य होते, ज्यासाठी दिवसाच्या शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज, डीएसपी मोहम्मद सिराजने आक्रमक पवित्रा घेत सलग तीन षटकार ठोकले आणि या रोमांचक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सिराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
10 Aug 2026 10:10 AM (IST)
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत होती. तिचा पती हिमांशू मल्होत्रा आणि अमृता विभक्त होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. या सगळ्या चर्चांदरम्यान आता अमृता खानविलकरने एक मोठे पाऊल उचलले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक अधिकृत कायदेशीर निवेदन शेअर केले आहे.
10 Aug 2026 09:59 AM (IST)
तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटूंबसोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाता, तेव्हा त्या ठिकाणच्या आठवणी गोळा करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही फोटो क्लिक करण्यास सुरुवात करता. पण जेव्हा संपूर्ण दृष्ट फोटोमध्ये क्लिक केलं जात नाही तेव्हा काय? संपूर्ण दृष्य फोटोमध्ये क्लिक करण्यासाठी वाईड अँगल सर्वात उत्तम मानला जातो. तुम्ही देखील वाईड अँगलचा वापर केला असेल… पण तुम्हाला माहिती आहे का, स्मार्टफोनमध्ये केवळ वाईड अँगल नाही तर इतर कॅमेरे देखील असतात. अनेक स्मार्टफोन्समध्ये दोन किंवा तीन कॅमेरे असतात. प्रत्येक स्मार्टफोन कॅमेऱ्याचं काम वेगळं असतं.
10 Aug 2026 09:50 AM (IST)
भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना आज आठवड्याच्या सुरुवातीलााच धक्का बसणार आहे. आज १० ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडने देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात संथ असल्याचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा १२ अंकांनी अधिक, सुमारे २४,६६७ अंकांवर व्यवहार करत होता.






