केंद्र सरकारचे जलजीवन मिशन, 'या' भागात १०० टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन
भारत रांजणकर, अलिबाग : प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असून, या कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. विशेष म्हणजे उरण, म्हसळा, खालापूर तालुक्यातील १०० टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ८६ टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.
जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवित आहेत.
तालुका : कुटुंबे : नळ कनेक्शन दीलेली कुटुंबे : टक्के
अलिबाग : ७१ हजार ३६४ : ५६ हजार १३२ : ७८.६७
कर्जत : ५४ हजार ५०९ : ४१ हजार ७९९ : ७६.६८
खालापूर : ३६ हजार ४७ : ३६ हजार ४७ : १००
महाड : ४२ हजार ४९९ : ३६ हजार ९४१ : ८६.९२
म्हसळा : १४ हजार ५६५ : १४ हजार ५६५ : १००
मुरुड : १६ हजार ४२३ : १५ हजार २६५ : ९२.९५
पनवेल : ८१ हजार ८३० : ७२ हजार ६०५ : ८८.७३
पेण : ४५ हजार ६७ : २९ हजार १९५ : ६४.७८
पोलादपूर : १६ हजार ५०३ : १३ हजार २९७ : ८०.५७
सुधागड : १५ हजार ८६५ : १२ हजार ४४५ : ७८.४४
तळा : ११ हजार ४९१ : १० हजार ३९६ : ९०.४७
उरण : ३६ हजार ३०० : ३६ हजार ३०० : १००
रोहा : ४२ हजार ६७० : ३७ हजार १९१ : ८७.१६
माणगाव : ४२ हजार १०४ : ३९ हजार ८१० : ९४.५५
श्रीवर्धन : २१ हजार ३८३ : १९ हजार ८३८ : ९२.७७