130 Teacher Posts Are Still Vacant In Zp Schools There Is No Group Education Officer For The Last Eight Years The In Charge Is In Charge Nrdm
ZP च्या शाळांमध्ये 130 शिक्षकांची पदे अदयापही रिक्त, गेल्या आठ वर्षापासून गटशिक्षणाधिकारीचं नाहीत, प्रभारीवर कारभार
मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 183 शाळांवर 665 मंजूर शिक्षकांपैकी 535 शिक्षक कार्यरत असून अदयापही 130 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने मुलांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 183 शाळांवर 665 मंजूर शिक्षकांपैकी 535 शिक्षक कार्यरत असून अदयापही 130 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने मुलांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. दरम्यान शाळा सुरु झाल्यानंतर तालुक्यात अनेक ठिकाणी शिक्षकांअभावी विदयार्थी व पालकांनी आंदोलन करून या शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.
शिक्षण हा समाजातील महत्वाचा घटक असून, शिक्षणाशिवाय समाज घडू शकत नसतानाही जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासनाने गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णतः बंद केल्याने ही शिक्षकांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विदयार्थी हा देशाचा आधारस्तंभ असतानाही काही शाळांमध्ये शिक्षकाअभावी विदयार्थ्यांची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात 16 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी लवंगी व बोराळे येथे ग्रामस्थांनी शाळेला चक्क कुलूप ठोकून शिक्षक दिल्याशिवाय आम्ही शाळा चालू देणार नसल्याचा नारा दिला. या आंदोलनामुळे शिक्षण विभागाला मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र प्रभारी गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांनी ग्रामस्थ व पालकांची मनधरणी करत त्या जागेवर दुसरे शिक्षक दिल्याने पालकांचे समाधान झाले.
बोराळे व लवंगी या दोन गावापुरता शिक्षकांचा प्रश्न मर्यादित नसून शिवप्रताप नगर, चौगुले वस्ती, मानेवाडी, डांगे वस्ती, रड्डे, लोणार, महमदाबाद हुन्नूर अशा ठिकाणीही या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. परिणामी येथे 11 शिक्षकांची गरज शिक्षण विभागाकडून असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर जिल्हा परिषदेकडे समाजशास्त्र विषयाचे 225 शिक्षक उपलब्ध आहेत. मात्र त्यांनी मनावर घेतले तर रिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटू शकतो, अन्यथा हा प्रश्न प्रलंबीत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मंगळवेढयात गेल्या आठ वर्षापासून गटशिक्षणाधिकारीच मिळाले नाहीत. सक्षम अधिकारी नसल्यामुळे योग्य निर्णय घेणे अवघड बनत आहे. येथील कारभार हा सध्या प्रभारी गटशिक्षणाधिकार्यावर चालत आहे. केंद्र प्रमुखाची एकूण 13 पदे असताना केवळ 3 व्यक्तीवर कारभार सुरु असून अदयाप 10 पदे रिक्त आहेत. तर मुख्याध्यापकाची 7 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विदयार्थी कसे घडणार हा पालकांना पडलेला प्रश्न आहे.
Web Title: 130 teacher posts are still vacant in zp schools there is no group education officer for the last eight years the in charge is in charge nrdm