
Maharashtra Breaking News Updates Today:
21 May 2026 11:36 AM (IST)
नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक उर्फ नैय्या खैरे यांच्या विरोधात मसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भुखंड हडपण्यासाठी भूखंड मालकाला धमकी देत 90 लाखांची खंडणी मागण्याचा आरोप त्यांच्या विरोधात आहे.
21 May 2026 11:26 AM (IST)
खासदार श्रीकांत शिंदें यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वंदे भारत ट्रेनने ठाणे ते नाशिक असा प्रवास केला. आज त्यांच्या नाशिक दौऱ्यात चांदवड, मनमाड, येवला, नांदगाव आणि मालेगाव मतदारसंघांमध्ये आढावा बैठका पार पडणार आहेत. आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
21 May 2026 10:40 AM (IST)
जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन ग्विर यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गाझाला मदत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांना इस्रायलने ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत गैरवर्तन केले जात आहे. त्यांची थट्टा उडवली जात आहे. या दृश्याने सर्वत्र खळबळ उडाली असून इटलीटच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
21 May 2026 10:30 AM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळून नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केल्या असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
21 May 2026 10:20 AM (IST)
नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाच्या तपासात सातत्य नवनवीन पैलू समोर येत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराज मोटेगावकर आणि त्यांच्याशी संबंधित नेटवर्क अत्यंत पद्धतशीरपणे काम करत असल्याचा आरोप तपास यंत्रणेचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालकांना त्यांच्या मुलांना निवडीबाबत पूर्ण खात्री दिली जात होती. याबदल्यात लाखो रूपयांचे पालकांशी व्यवहार ठरत होते. अनेक पालक त्यांना ‘ब्लँक चेक’ देण्यासही तयार होते, असा दावा तपासशी सुत्रांनी केला आहे. तसेच सुरवातीला टोकन रक्कम घेतली जात असून परीक्षा संपल्यावर प्रश्नांचे क्रॉस चेक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जात असे
21 May 2026 10:10 AM (IST)
मध्य पूर्वेतील (Middle East) राजकीय आणि लष्करी परिस्थिती सध्या अत्यंत स्फोटक बनली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य महायुद्ध रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील शांतता वाटाघाटी आता एका अतिशय ‘गंभीर आणि निर्णायक टप्प्यावर’ पोहोचल्या असून इराणने योग्य पाऊल उचलले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. एअर फोर्स वन या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाने प्रवास केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अमेरिकेची पुढील रणनीती उघड केली.
21 May 2026 09:58 AM (IST)
ठाणे जिल्ह्यातील नौपाड्यातीलतील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला अचानक आग लागल्याने शहरात आगीचा भीषण तांडव पाहायला मिळाला. आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आणि यात दोन जणांना मृत्यू झाल्याचीही बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, पहाटे ३:३० च्या सुमारास आग लागली, ज्यात मार्केटमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला. या आगीमुळे आर्थिक नुकसान तर झालेच शिवाय बचावासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकाचा आणि अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यूही झाला. काळू गाडेकर असे सुरक्षा रक्षकाचे नाव होते तर सागर शिंदे असे अग्निशमन जवानाचे नाव होते. आगीची भीषणता फार होती ज्यामुळे यातून तीव्र धूर बाहेर पडला. या धूरामुळेच गुदमरुन दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
21 May 2026 09:40 AM (IST)
WTC Rankings: बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत २-० असा ऐतिहासिक 'व्हाइट वॉश' दिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले असून याचा थेट धक्का टीम इंडियाला बसला आहे. या विजयासह बांगलादेशने थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली असून, भारतीय संघाची घसरण आता सहाव्या स्थानावर झाली आहे.
मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी ४३७ धावांचे मोठे आव्हान मिळाले होते, मात्र बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ ३५८ धावांवर बाद झाला आणि बांगलादेशने हा सामना ७८ धावांनी जिंकला. यापूर्वी मीरपूर येथे झालेली पहिली कसोटी बांगलादेशने १०४ धावांनी जिंकली होती. या दारूण पराभवामुळे पाकिस्तान संघ डब्ल्यूटीसी रँकिंगमध्ये आठव्या स्थानावर फेकला गेला आहे, तर भारताला मागे टाकत बांगलादेशने पाचवे स्थान काबीज केले आहे.
21 May 2026 09:35 AM (IST)
NEET Exam : देशभरात गाजत असलेल्या 'नीट' पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्यातील नामांकित 'मॉडर्न कॉलेज'पर्यंत पोहोचले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात जाऊन अतिशय गोपनीय आणि सखोल तपासणी केली. या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा मांढरे (Manisha Mandhare) यांच्या कपाट, लॉकर आणि डेस्कची सीबीआय अधिकाऱ्यांनी कसून झाडाझडती घेतली, तसेच त्यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रेही तपासली.
या कारवाई दरम्यान सीबीआयने मॉडर्न महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी केली असून, मनीषा मांढरे यांचे कॉलेजमधील नियुक्तीपत्र आणि त्यांची 'राष्ट्रीय परीक्षा एजन्सी' (NTA) मध्ये झालेली नियुक्ती या संदर्भातील सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी केली.
21 May 2026 09:30 AM (IST)
Pune Water Crisis: पुणे जिल्ह्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेचा आणि उन्हाळ्याच्या तीव्रतेचा थेट परिणाम आता जलसाठ्यावर दिसू लागला असून, शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. उन्हाळी आवर्तनामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाला असून, एकीकडे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे धरणसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पुण्यावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या बिघडत्या परिस्थितीमुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली असली, तरी प्रशासनाने ३१ मे पर्यंत शहरात कोणतीही पाणीकपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांना तूर्तास दिलासा दिला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पुढील काळात पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.
NEET Exam 2026: ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी लातूरचा डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयकडून अटक
देशभरात खळबळ उडवणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात (NEET Exam 2026 Paper Leak) केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी लातूरचा मूळ रहिवासी असून त्याचे नाव डॉ. मनोज शिरुरे असे आहे. बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. शिरुरे याने मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. सीबीआयने त्याला लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणले होते आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली. नीट पेपरफुटीच्या आतापर्यंतच्या तपासात एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी केवळ पेपर फोडणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर कारवाई झाली होती, मात्र आता थेट पेपर खरेदी करणाऱ्या पालकालाच अटक झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून याचे धागेदोरे आणखी गडद होत चालले आहेत.