सावधान! ४ वाघांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच ५१ कावळ्यांचा मृत्यू; महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अलर्ट जारी
महाराष्ट्रात बर्ड फ्लू पुन्हा वेगाने पसरत असल्याचं समोर येत आहे. अलिकडेच नागपूरमध्ये ३ वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. यानंतर लातूरमधूनही मोठ्या संख्येने कावळे मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे जिल्ह्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
Walmik Karad: वाल्मीक कराडचे काय होणार? केज कोर्टात उद्या होणार महत्वाची सुनावणी
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे ५१ कावळे मृत्युमुखी पडले आहेत. यानंतर, अधिकाऱ्यांनी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी पीटीआयला सांगितले की, भोपाळ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेकडून शनिवारी मिळालेल्या अहवालात लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू एव्हीयन इन्फ्लूएंझा (H5N1 विषाणू) मुळे झाल्याचं निदान झालं आहे.
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे म्हणाले की, शनिवारपर्यंत उदगीर शहरातील विविध भागात ५१ कावळे मृतावस्थेत आढळले. १३ जानेवारीपासून अधिकाऱ्यांना उद्याने आणि शहरातील इतर भागात मृत पक्ष्यांच्या तक्रारी येत होत्या. यानंतर, अधिकाऱ्यांनी बाधित भागांना भेट दिली आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी १४ जानेवारी रोजी सहा मृतदेह प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
लातूर जिल्हा प्रशासनाने रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्या ठिकाणी मृत कावळे आढळले त्या ठिकाणाभोवतीचा १० किलोमीटरचा परिसर ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या आदेशात बाधित भागात लोकांच्या हालचाली आणि पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीवरही निर्बंध लादले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार, बाधित भागांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. अधिकारी १० किलोमीटरच्या परिघात असलेल्या सर्व पोल्ट्री फार्मचे सर्वेक्षण करतील आणि नमुने चाचणीसाठी पाठवले जातील. जिल्ह्याच्या इतर भागात पक्षी किंवा प्राण्यांचा असामान्य मृत्यू झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा वन विभागाला कळवावे, असं आवाहन प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना केलं आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चिरनेर येथे परसदारातील कुकुट पक्षांमध्ये मरतुक आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळा, भोपाळ मध्यप्रदेश येथे रोग निदानास्तव पाठवण्यात आले होते. सदर प्रयोगशाळेत कुकुट पक्षातील मरतूक एव्हियन इन्फ्लुएंझा/ बर्ड् फ्लू या रोगाची लागण असल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
चिरनेर परसदारातील कुकुट पक्षांमध्ये मरतुक आढळल्याने रोग निदानासाठी नमुने अटल बिहारी वाजपेयी रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवण्यात आले होते. तेथून सदरचे नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळा, भोपाळ येथे रोग निदानास्तव पाठवण्यात आले. सदर प्रयोगशाळेने कुकुट पक्षातील मरतूक एव्हियन इन्फ्लुएंझा/ बर्ड् फ्लू आढळले आहे. हा आजार मानवी शरीरात संक्रमित होऊ शकतो.