वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून 8 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
Panvel News: पनवेल ग्रामीण परिसरात मंगळवारी (6 मे) सायंकाळ पासून वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसामुळे पालिकाहद्दीत 9 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असल्याचे समोर आले. या वादळी वाऱ्यामुळे पाच दुचाकीसहित 3 चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासहित आलेल्या अवकाळी पावसाने पनवेल परिसराला चांगलेच झोडपून काढले आहे.
मंगळवार ( ता. 6) सायंकाळी आणि बुधवारी ( ता. 7) पडलेल्या या पावसामुळे शेतीचे आणि आंबा फळाचे मोठे नुकसान झाले आहे.पनवेल पालिका हद्दीत पनवेल शहर, नवीन पनवेल शहर तसेच कळंबोली वसाहत या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे. मंगळवारी सुरु झालेल्या पावसामुळे वृक्ष कोसळण्याच्या घटनांचे जवळपास 9 कॉल अग्निशमन दलाला आले होते. ज्या मध्ये सर्वाधिक 4 कॉल कळंबोली अग्निशमन दलाला आले असून, कामोठे वसाहती मधील एका कॉल चा देखील या मध्ये समावेश आहे. त्याच सोबत पनवेल अग्निशमन दलाला 3 तर नवीन पनवेल अग्निशमन दलाला 2 ठिकाणी वृक्ष कोसळण्याचे कॉल आल्याने मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे,आणि अग्निशमन केंद्र अधिकारी हरिदास सूर्यवंशी यांच्या निर्देशाने उन्मळून पडलेले वृक्ष हटवण्याचे काम पनवेल पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खारघर अग्निशमन दलाचे पनवेल पालिकेकडे हस्तातरण झालेले नाही. सिडकोच्या वतीने या भागात अग्निशमन सेवा पुरवण्यात येते. खारघर अग्निशमन दलाच्या हद्दीत मंगळवार पासून दोन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत ज्या मध्ये 2 चार चाकी चे नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे डहाणू तालुक्यात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्याने आणि पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. जोरदार वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांत शेती, मच्छीमारी, वीट व्यवसाय आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
डहाणू खाडी परिसरात समुद्रकिनारी उभ्या असलेल्या सुमारे ५० मच्छीमारांच्या बोटी वादळी वाऱ्यामुळे एकमेकांवर आदळून नुकसानग्रस्त झाल्या आहेत. तालुक्यात जवळपास २५० घरांची पडझड झाल्याचे समोर आले असून, अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सेंचुरी वाळूपाडा आणि जानेवारी गावांमध्ये घरांचे पत्रे व छप्परे उडाले असून, स्थानिक नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली असून, विजेचे खांब कोसळल्याने संपूर्ण रात्रीपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांनी सांगितले की, “तालुक्यात सुमारे २५० घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच डहाणू खाडीतील अंदाजे ५० बोटींचेही नुकसान झाले आहे.”
या वादळी वाऱ्यामुळे वीट भट्टी, गवत वखार व्यवसाय तसेच भातशेती, मिरची, भाजीपाला आणि आंबा बागायती शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून मदतीसाठी मागणी करण्यात येत आहे.