वर्धा : बनावट कागदपत्रांच्या (Forged documents) आधारे बँकेतून सुमारे ३० लाख रुपयांचे कर्ज काढले. या प्रकरणी तत्कालीन बँक व्यवस्थापकासह (Bank Manager) अन्य दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयकुमार धनू हावरे (६०) (रा. पूजा पॅलेस, नागपूर यांचा लक्ष्मीनगर), वर्धा (Wardha) येथे प्लॉट आहे. काजी करंजी येथील आरोपी प्रशांत धोटे याने बनावट कागदपत्रे तयार करून सदर भूखंड बँक आँफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) बँकेकडे गहाण ठेवला होता. ज्याच्या आधारे धोटे पोल्ट्री फार्म नावावर ३० लाखाचे कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर कर्जाचे २५ लाख रुपये त्यांचे भागीदार दयानंद आबा भटारकर यांच्या खात्यावर जमा केले, अशी माहिती हावरे यांना मिळाली.
बनावट स्वाक्षरी आणि बनावट कागदपत्रांच्या (Forged signatures and forged documents) आधारे हे कर्ज उचले. कर्ज विवरण पत्र, बनावट कागदपत्र, नोटराइज्ड व्हेरिफिकेशनच्या आधारे हेराफेरी केली होती. याच दरम्यान विजयकुमार हावरे नागपूर येथे होते. मे २०२० ते जुलै २०२० या कालावधीत लॉकडाऊनमुळे ते वर्ध्याला आले नव्हते. ४ जून २०२० रोजी बँक आँफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकाकडे हावरे गेले असता त्यावेळी ही घटना समोर आली.
हावरे यांचे भूखंड २६ वर्ष जुने आहे. त्याची सध्याची किंमत १२ ते १३ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याचा सातबाराही एकत्रित आहे. यामुळे दयानंद भटारकर आणि प्रशांत धोटे यांनी संगनमत करून प्लॉटवर कर्ज घेतले. या कामासाठी त्यांना बँकेचे व्यवस्थापक आर.पी. राईकवाड यांनी मदत केली. तपासानंतर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.