फोटो सौजन्य: Gemini
नेवासा तालुका हा मराठवाड्याला लागून असल्याने मराठवाड्यातील विविध भागातून चंदनाचे लाकूड चोरी करून ते सोनईमध्ये आणले जाते आणि येथे विकले जात असल्याची माहिती समोर येत आहे. सोनईमध्ये फार पूर्वीपासून चंदन तस्करीचे रॅकेट सक्रिय असून, काही वन कर्मचाऱ्यांच्या जाणूनबुजून दुर्लक्षामुळेच तस्करांचे जाळे अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. परिणामी, सोनई परिसरात चंदन तस्करी करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत.
Ahilyanagar News: वाळूतस्कराची इतकी हिंमत! कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातला डंपर
कमी कष्टात जास्त पैसा मिळत असल्याने अनेक तरुण या गैरव्यवसायाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. सोनईतील या चंदन तस्कर टोळ्यांची मजल नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचली असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही येथील तरुण चंदनाची झाडे आणण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. सोनईमध्ये चंदन तस्करीचा एक मोठा बुकी सक्रिय असून येथून परराज्यातही मालाचा पुरवठा केला जात असल्याचे समजते. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रशासनाकडून याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोनई एसटी बसस्थानक परिसरात सकाळच्या वेळेत चंदन तस्करांची टोळकी उघडपणे फिरताना दिसत असल्याची माहिती आहे. यावरून येथील बुकीची दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
दिवसा झाडांची टेहळणी आणि रात्री चंदनाची झाडे कापून नेण्याचे प्रकार सर्रास सुरू असून, वन विभाग, स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करून या चंदन तस्करांना आवर घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.






