Court
वर्धा : अवघ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Crime News) करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी दिला.
किरण महादेव शहारकर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. किरण शहारकर याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 5 (एम) सहकलम 6 अन्वये 20 वर्षांचा सश्रम कारावास व 30 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रक्कमेतून 15 हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे. संबंधित प्रकरणी तक्रारीवरून देवळी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेतल्यावर पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांनी प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
शासकीय बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. गिरीष व्ही. तकवाले यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून भारती करंडे यांनी काम पाहिले. या प्रकरणी एकूण 9 साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आदोने यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.