संग्रहित फोटो
बारामती नगरपरिषदेची निवडणूक यापूर्वी पुढे ढकलण्यात आली होती. नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १४ उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी एकूण १४५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित ३४ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून सचिन सातव हे उमेदवार आहेत.
राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी भाजपने काही अपक्ष उमेदवारांना सोबत घेत पॅनल उभे केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने महायुतीतील घटक पक्षांसह वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी शरद पवार गटाकडून बळीराम बेलदार, भाजपकडून गोविंद देवकाते, तर बसपाकडून काळूराम चौधरी हे उमेदवार रिंगणात आहेत.
मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर
दरम्यान, आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या सांगता सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढील तीन दिवस बारामतीत मुक्काम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या काळात काही प्रभागांतील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासह शहरातील मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या सांगता सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.






