सौजन्य - नवराष्ट्र टीम
प्राथमिक माहितीनुसार, चाकण बाजूकडून औद्योगिक वसाहतीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे पुढील चाक तुटल्याने रिक्षा असंतुलित झाली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने अपघाताची तीव्रता वाढली. कल्याणी हॉटेलजवळ, सिग्मा कंपनीसमोर हा अपघात घडला. या अपघातात कामावर जात असलेल्या दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामसुंदर राम खिलावन शाखेद (वय 47, सध्या रा. म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. ओडकी, जिल्हा रिवा, मध्य प्रदेश), पिंटू राजन बिहारा (वय 25, सध्या रा. म्हाळुंगे; मूळ रा. पट्टा सुंदरपूर, पुरी, ओडिशा) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत तर रोहिदास सीताराम आडे (वय 36, रिक्षाचालक, रा. खराबवाडी), सागर मोहन मॉन्टी (वय 26, रा. खराबवाडी) हे जखमी झाले आहेत.
दरम्यान, चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रिक्षांना केवळ तीन प्रवाशांची परवानगी असताना दाटीवाटीने दहा–पंधरा प्रवासी कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. अशा बेजबाबदार वाहतुकीमुळेच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अपघातप्रकरणी पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करीत असून, अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.






