मुंबई : भरधाव वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच भरधाव वाहन चालवताना नियंत्रणात न आल्याने दुर्घटना होण्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यात आता मुलुंडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा (Mulund Accident) मृत्यू झाला आहे. चालकाने ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय दाबला आणि अपघात झाला. या अपघातात एका 76 वर्षीय सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा (Police Died in Mulund Accident) मृत्यू झाला आहे.
तुकाराम सावंत असे यामध्ये मृत्यू झालेल्या माजी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. सावंत हे मुलुंड पश्चिमेकडील महात्मा गांधी रोड परिसरातील नर्मदा देवी सोसायटीत आपल्या कुटुंबासह राहतात. गेल्या 15 वर्षांपूर्वी ते मुंबई पोलिस दलातून निवृत्त झाले होते. 27 जूनला सायंकाळी नेहमीप्रमाणे 6 वाजता घराबाहेर पडले. नेहमी सायंकाळी सहा वाजता शंकराच्या मंदिरात देवदर्शन करून रात्री नऊच्या सुमारास घरी जेवणासाठी परतायचे. मात्र, नऊ वाजल्यानंतरही घरी न आल्याने मुलाने कॉल करण्यास सुरुवात केली. कॉलला प्रतिसाद न मिळाल्याने वडिलांना शोधण्यासाठी ते घराबाहेर पडले.
लोकांची गर्दी दिसली अन्…
बी. पी. क्रॉस रोडने जात असताना रस्त्यामध्ये लोकांची गर्दी दिसून येताच त्यांनी तेथील पोलिसांकडे चौकशी केली. तेव्हा, अपघात झाला असून, 70-75 वर्षांच्या जखमी व्यक्तीला अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. तेथे त्यांना त्यांचे वडील असल्याचे समजताच धक्का बसला.
कुटुंबियांची रुग्णालयात धाव
तुकाराम सावंत यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी लगेचच रुग्णालयात धाव घेतली. रात्री पावणे दहाच्या सुमारास सावंत यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत चालकाला अटक केली आहे.






