कांदा काढण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात (फोटो सौजन्य- PINTEREST)
बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीड-अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला.
कामगार दिनाच्या दिवशी कांदा काढण्यासाठी जाणाऱ्या अपघातात महिला मजुरांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली. याची माहिती समजताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान अपघात घडला. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता. मात्र, धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला.
तसेच दुसऱ्या एका घटनेत, मुंबई-नाशिक महामार्गावर अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर 2 भीषण अपघात घडले आहेत. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिला अपघात शहापूर तालुक्यात घडला. महामार्गावर पायी चालणाऱ्या दोन व्यक्तींना एका कारने जोरदार धडक दिली. तर, दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पहिला अपघात शहापूर तालुक्यातील एका गावात घडला. महामार्गावर पायी चालणाऱ्या २ व्यक्तींना एका कारने जोरदार धडक दिली.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक झोपेत असल्याचा अंदाज आहे. या भीषण कार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.