मुंबई : अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे (Umesh kolhe) हत्या प्रकरणी रोज काही ना काही नवी माहिती समोर येत आहे. या हत्याकांडातील आरोपी शाहरुख पठाण याच्यावर ऑर्थर रोड तुरुंगात हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. पाच जणांनी त्याला मारहाण केली असून या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. एनआयएनं याप्रकरणी सात आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, यातील आरोपी ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. यांपैकी शाहरुख पठाण हा आरोपी ज्या बराकमध्ये आहे त्याच बराकीतील पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. पाच लोकांनी त्यानं मारहाणीचा आरोप केला आहे. याप्रकरणी या पाच जणांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. पण मारहाणीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
उदयपूरच्या कन्हैयालाल याच्या हत्येनंतर 21 जून रोजी अमरावतीमध्ये 54 वर्षीय उमेश कोल्हे यांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांच्याकडून करण्यात आलेली पोस्ट केल्यामुळे हा सगळा प्रकार झाला होता. उमेश कोल्हे हे मेडिकल स्टोअर बंद करून जात असताना 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान अचानक दोन मोटारसायकलस्वारांनी अडवले. त्यानंतर हल्लेखोराने त्याच्या गळ्यावर डाव्या बाजूला चाकूने वार केले. या दरम्यान तो गंभीर जखमी झाले. परिसरातील लोकांनी उमेशला जवळच्या एक्सॉन रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.