वढाणेच्या सरपंचासह ग्रामसेवकाची अपहार प्रकरणात निर्दोष मुक्तता

या खटल्याची सुनावणी बारामती येथील प्रथम वर्ग न्यायाधिश अटकारे यांच्या न्यायालयात सुरु होती. सरपंच आरोपी तर्फे अॅड. विशाल बर्गे यांनी काम पाहिले.

    बारामती :  बारामती तालुक्यातील वाढणे गावचे माजी सरपंच भानुदास चौधरी आणि ग्रामसेवक संतोष सकट यांची पाझर तलावाच्या कामात १ लाख ४९ हजार रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपातून बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बारामती न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधिश अटकारे यांनी हा निकाल दिला.

    वढाणेगांवचे माजी सरपंच चौधरी आणि ग्रामसेवक सकट यांनी गावातील पदमावती पाझर तलावाच्या कामात १ लाख ४९ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याची तक्रार ठेकेदार उध्दव सावंत यांनी बारामती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भानुदास साळवे यांच्याकडे केली होती. तसेच त्यावेळचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले यांनीही वडगांव निंबाळकर ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी पदमावती पाझर तलावात दुरुस्ती कामात सरकारी पैशांची अपहार केल्याच्या आरोपाखाली चौधरी आणि सकट यांच्या विरोधात २९ जून २०११ रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक सी. एम. सुतार करीत होते.

    या खटल्याची सुनावणी बारामती येथील प्रथम वर्ग न्यायाधिश अटकारे यांच्या न्यायालयात सुरु होती. सरपंच आरोपी तर्फे अॅड. विशाल बर्गे यांनी काम पाहिले.

    या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. परंतू, आरोपींच्या वकिलांनी साक्षीदारांच्या केलेल्या उलटतपासणीमध्ये पदमावती पाझर तलावाच्या दुरूस्तीचे काम ठेकेदार सावंत यांना दिलेले नव्हते. तसेच वर्क ऑर्डर सावंताच्या नावाने दिलेली नव्हती, हे स्पष्ट केले. याउलट हे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव झाला होता. त्यावरुन सरपंच चौधरी यांनी पाझर तलाव दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीमार्फत केले. दुरुस्तीसाठी लागणारे दगड, विटा, सिमेंट, स्टील आदी साहित्य खरेदी करुन त्याचे पैसे चेकने दिले गेले होते. परंतू, स्थानिक राजकारणातून त्यावेळचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले यांनी खोटी फिर्याद दाखल करण्यास भाग पाडले आणि चौधरी यांना खोट्या गन्ह्यात गोवण्यात आल्याचे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शानास आणून दिले. तसेच आरोपीने कोणताही अपहार केला नाही. उलट प्रामाणिकपणे पाझर तलाव दुरुस्त करुन त्यासाठी आलेल्या खर्चाचा पावतीसह सरकारला हिशोब दिला असल्याचे न्यायालयात सिद्ध केले. आरोपींच्या वकिलांचा हा बचाव मान्य करीत न्यायाधिश अटकारे यांनी या खटल्यात माजी सरपंच चौधरी आणि ग्रामसेवक सकट यांची निर्दोष मुक्तता केली.