'महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासनाने प्रलंबित कामे मार्गी लावावीत'; मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचना
मेढा : शेतकरी हा केंद्रबिंदू मानून महायुतीचे सरकार काम करत आहे. जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतीचे पंचनामे महसूल विभागाने करावेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यात सामान्य नागरिकांची जास्तीत जास्त प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाने काम केले असून, यापुढेही राज्य शासनाच्या सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना तळागाळात पोहचवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. राज्यातील बळीराजाच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभे असून, बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
मेढा येथील कलश मंगल कार्यालयात महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांर्गत सेवा पंधरवड्याच्या तालुकास्तरीय कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी आशिष बारकुल, विकास व्यवहारे, तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे,नायब तहसीलदार संजय बैलकर यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे, यासाठी राज्य सरकार काम करत आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, मराठवाड्यात सर्वाधिक शेतीचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने २४४ कोटी रुपये निधी दिला आहे. सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव अर्थसहाय्य मिळण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
नैसर्गिक आपत्तीचे कोणीही राजकारण न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी मिळून उभे राहिले पाहिजे. महाराजस्व अभियानातून शेतकऱ्यांचे बऱ्याच वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे बाधित जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री भोसले यावेळी म्हणाले.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते विविध योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी शिक्षण विभाग, महसूल विभाग, नगरपंचायत मेढा, पंचायत समिती, वीज वितरण कंपनी, तालुका कृषी अधिकारी, बालविकास प्रकल्प, भूमी अभिलेख विभाग, एसटी महामंडळ यांच्या वतीने लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.