मुंबई : देशभरात टोमॅटोचे भाव (Tomato Prices) गगनाला भिडले आहेत. कुठे टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे, तर कुठे प्रतिकिलो 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी टोमॅटोच्या दरात दिलासा मिळाला असला तरी आता कांद्याच्या दरातही (Onion Prices) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होऊ शकते, असे एका अहवालात म्हटले आहे. सध्या कांद्याचा भाव प्रतिकिलो 28 ते 32 रुपयांपर्यंत आहे.
ऑगस्टअखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरवठ्यात कमतरता असल्याने पुढील महिन्यात ही वाढ सुमारे 60 ते 70 रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅतनालिटिक्सच्या अहवालानुसार, एवढी किंमत वाढल्यानंतरही या वाढलेल्या किमती 2020 च्या सर्वोच्च पातळीच्या तुलनेत खालीच राहणार आहेत.
रब्बी कांद्याचे शेल्फ लाइफ 1-2 महिन्यांनी कमी झाल्यामुळे आणि यंदा फेब्रुवारी-मार्चमध्येच विक्री झाल्यामुळे खुल्या बाजारात रब्बीच्या कांद्याचा साठा सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीस लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारात पुरवठ्याची कमतरता होणार असून, भाव वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये नवीन कांद्याचे पीक आल्यावर भाव पुन्हा खाली येऊ शकतात.
पेरणीत घट
कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कमी कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे या वर्षी क्षेत्रात 8 टक्क्यांनी घट होणार असून, कांद्याचे खरीप उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घटणार आहे. वार्षिक उत्पादन 29 दशलक्ष टन (एमएमटी) अपेक्षित आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्के जास्त आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी उत्पादन कमी असूनही यंदा मोठी तूट येण्याची शक्यता नाही.