फोटो सौजन्य: Gemini
बुधवारी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास रोहित पवार हॉटेलवर ग्राहक पाहत असताना सात ते आठ जणांच्या टोळीने अचानक हॉटेलवर हल्ला केला. आरोपींनी आधी हॉटेलची तोडफोड केली आणि त्यानंतर रोहित पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
जखमी रोहित पवार यास तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर (नगर) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Ahilyanagar News: “जोपर्यंत देवभाऊ तोपर्यंत लाडकी बहीण…”, पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य
ही गोळीबाराची घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली, याबाबत पोलीस तपास सुरू असून मागील भांडणातूनच हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून त्यामध्ये दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून, तेथे गावठी कट्ट्याचे अवशेष आढळून आले आहेत. जामखेड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलबें, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे तसेच जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
जामखेड शहरात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, नगर रोड आणि बीड रोड हे दोन्ही मार्ग रात्रीच्या वेळी संवेदनशील बनत आहेत. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे जामखेडमध्ये कडक कारवाई करणाऱ्या खमक्या पोलिस अधिकाऱ्याची गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.






