
कोणाच्या घरात होते ड्रग्ज? सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट पारनेर व नगरपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणात गंभीर शंका उपस्थित करत अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण सत्य जनतेसमोर मांडावे, अशी मागणी केली आहे.
Nagpur Crime: नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन
डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला पोलिस कर्मचारी पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना अवैध व्यवसायिकांशी संबंधित होता. त्या काळात त्याच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि बदलीची मागणीही पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. असे असतानाही संबंधित वादग्रस्त पोलिसाची थेट अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत बदली कशी झाली, याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
एकीकडे एलसीबीमध्ये प्रामाणिक पोलिसांची नियुक्ती केल्याचा दावा प्रशासन करत असताना, वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्याला कुणाच्या शिफारसीवरून एलसीबीमध्ये घेण्यात आले, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ड्रग्ज प्रकरणात जप्त करण्यात आलेले सुमारे दहा किलो ड्रग्ज पारनेरमधील दोन व्यक्तींच्या घरात साठवून ठेवण्यात आले होते. मात्र, त्या घरमालकांची नावे अद्याप समोर का आणली जात नाहीत? संबंधित व्यक्ती कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांची नावे गुन्ह्यात येऊ नयेत यासाठी पोलिस ठाण्यात कोण दबाव टाकत होते? असे अनेक प्रश्न उपस्थित करत डॉ. विखे पाटील यांनी पोलिसांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन याची उत्तरे द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जेजुरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; प्रवासी संघटना अन् लोकप्रतिनिधी आक्रमक
या प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. अन्यथा पुढील आठ दिवसांत आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सर्व संबंधितांची नावे जाहीर करू, असा इशाराही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्यात कुणीही सहभागी असेल, तो कुणाचाही कार्यकर्ता असो, त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा झालीच पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारनेरमध्ये झालेल्या राड्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या घटनेत एका गर्भवती महिलेला मारहाण झाल्याचे वृत्त असून, लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील व्यक्तीकडून असे कृत्य होणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. विखे पाटील यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले, तरी “पारनेर येथील कार्यकर्ते” असा उल्लेख केल्यामुळे या प्रकरणात खासदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ड्रग्ज ज्या घरात साठवले होते, ते कार्यकर्ते खासदार लंके यांचेच होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.