
Ajit Pawar and Sharad Pawar alliance for Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections
Pune Politics : पुणे : आकाश ढुमेपाटील : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, (Political News) जिल्ह्यातील लढत दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप–शिवसेना अशी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून १०५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. विशेष बाब म्हणजे या मुलाखतींच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, दौंड, राजगड, मुळशी आदी तालुक्यांतील ३५ जिल्हा परिषद गट व ७० पंचायत समिती गणांसाठी इच्छुकांच्या मुलाखती दुपारी तीन वाजता सुरू झाल्या. या प्रक्रियेत स्थानिक राजकीय परिस्थिती, निवडणुकीतील ताकद, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि जनसंपर्क याबाबत सखोल प्रश्न विचारण्यात आले. काही ठिकाणी इंदापूर तालुक्यातील मुलाखती स्वतंत्रपणे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हे देखील वाचा : BMC महापौर पदासाठी भाजपनेही खेळला डाव! सावध भूमिका घेत नगरसेवकांना दिल्या खास सूचना
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “एकत्रितपणे निवडणूक लढविण्याच्या भूमिकेत असलेले काही इच्छुक कार्यकर्ते अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते. कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार काही तालुक्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील, तर काही ठिकाणी वेगवेगळे पर्याय राहतील.” विशेष म्हणजे, सर्व इच्छुकांना जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ‘घड्याळ’ चिन्हावर लढावी लागू शकते, अशी शक्यता दक्षिण जिल्हाध्यक्षांनीही व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेप्रमाणेच ग्रामीण भागातही एकत्रित रणनितीचा प्रयोग होऊ शकतो.
दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीनेही जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. रविवारी पुण्यातील भाजप कार्यालयात दक्षिण पुणे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. या वेळी भाजपाचे महामंत्री, जिल्हाध्यक्ष, तसेच दौंडचे आमदार उपस्थित होते. सक्षम, अनुभवी आणि जनतेशी थेट संपर्क असलेल्या उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात आला. महापालिकेतील निर्विवाद सत्तेनंतर आता भाजपाने ग्रामीण भागातही सत्ता मिळविण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हे देखील वाचा : नगरसेवकांचे ‘मानधन’ नेमके किती? वाचा महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या सुविधांचा लेखाजोखा
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाने शिवसेनेला बरोबर घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा पारंपरिक मतदार असल्याने आणि पूर्वी जिल्हा परिषदेत शिवसेनेचे सदस्य असल्याने, मतविभाजन टाळण्यासाठी ही युती फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. एकूणच, गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वर्चस्व राखणाऱ्या राष्ट्रवादीला भाजप–शिवसेना युतीकडून कडवी झुंज मिळण्याची चिन्हे आहेत. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ही लढत अधिक रंगतदार होणार आहे. येत्या काही दिवसांत उमेदवार निश्चिती आणि युतींची घोषणा झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल.