मुंबई- छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणू नका, या विधानसभेतील वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार ठाम असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादंग सुरु आहे. भाजपानं यावरुन अजित पवार यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरु केलंय. अजित पवारांच्या विरोधी पक्षनेत्याच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं हे पद दिलंय, त्यामुळं आपला राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपाला नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. आपण आपली भूमिका मांडली, विचार स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आपण आपली भूमिका मांडली, ती कुणाला पटावी की नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. शरद पवार यांनीही यात कुणाला स्वराज्यरक्षक म्हणावं वा धर्मवीर म्हणावं, असं वक्तव्य केलंय, त्यानंतरही अजित पवारांनी पवार हेच सर्वोच्च नेते असल्याचं सांगत त्यांनी घेतलेली भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं.
[read_also content=”यंदा साहित्य संमेलनाला दोन कोटींचं अनुदान मिळणार? मंबईतील मराठी टक्का कमी होऊ देणार नाही, विश्व मराठी संमलेनात काय म्हणाले मुख्यमंत्री? https://www.navarashtra.com/maharashtra/will-sahitya-sammelan-get-a-subsidy-of-two-crores-this-year-the-marathi-percentage-in-mumbai-will-not-be-allowed-to-decrease-what-did-the-cm-say-359164.html”]
मी कोणता गुन्हा गेला?
आपण केलेल्या वक्तव्यात कोणत्याही महापुरुषांचा अवमान केलेला नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. मात्र राज्यपाल आणि भाजपाच्या काही नेत्यांनी शिवरायांचा अवमान केला, त्यांनी अद्याप दिलगिरी, माफी का मागितली नाही असंही अजित पवार यांनी सांगितलंय. विधानसभेत मुद्दा मांडला तेव्हा विरोध झाला नाही, हे ठरवणारा मास्टरमाईंड त्यावेळी सभागृहात नव्हता. मात्र बाहेर पडल्यानंतर या मुद्द्याचं राजकारण करण्यात आलं. निरोप देण्यात आले आणि आंदोलनं करण्यात आली, असं अजित पवार म्हणाले.
धर्मवीर अनेक आहेत -अजित पवार
छत्रपती संभाजी महाराज यांना काहीजण धर्मवीर म्हणतात. मात्र अनेकांना धर्मवीर अशा पदव्या आहेत. काहींच्या नावानं सिनेमे निघाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना असलेली उपाधी ही एकाच व्यक्तीला असू शकते, इतरांना ती उपाधी असू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
संभाजीराजे स्वराज्यरक्षकच
दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी याबाबतचा इतिहासही काळाच्या ओघात बदलला. छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असे संबोधण्यात येत होते. मात्र महात्मा फुलेंनी कुळवाडी भूषण असा त्यांचा उल्लेख केला. गोब्राह्मण प्रतिपालक या संबोधनात छत्रपती शिवाजी महाराज हे एका प्रतिमेत मर्यादित होत होते. तसाच संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटल्यानं ते एका धर्मापुरते मर्यादित होतात. त्यांनी अठरापगड जातीच्या राज्याचं रक्षण केलंय. त्यामुळे स्वराज्यरक्षक ही उपमाच त्यांना योग्य असल्याचं अजित पवार म्हणाले. स्वराज्य यात स्वातंत्र्य संस्कृती, धर्म या सगळ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आपण धर्माविरोधात नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलंय.
इतिहास तज्ज्ञांनी ठरवावं
आपण आपल्या इतिहासाच्या आकलनानं हे मत मांडलं. हे आपलं वैयक्तिक मत आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं. याबाबत इतिहासतज्ज्ञ आणि इतिहास संशोधकांनी अभ्यास करुन ठरवावं, असंही अजित पवार म्हणाले.